
एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱया 2296 कर्मचाऱयांना 24 तासांत कामावर येण्याची नोटीस बजावली असतानाच कायम कर्मचारी कामावर आले नाहीत तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सामावून घेऊ, असे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज सांगितले. दुसरीकडे परिवहनमंत्री परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची संपासंदर्भात बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगतानाच फडणवीसांच्या सूचनांचा नक्कीच विचार करू, असे परिवहनमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.
एसटी संपावर तोडगा निघावा यासाठी परिवहनमंत्री अनिल परब आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. फडणवीस यांनी काही सूचना केल्या असून त्याबाबत सर्वांचे मत जाणून घेऊन विचार करू असे अनिल परब म्हणाले.
राज्यातील एसटी कर्मचाऱयांचा संप फार काळ सुरू राहणे चांगले नाही. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून कर्मचाऱयांची समस्या निकाली काढाव्यात आणि त्यासाठी आम्ही मदत करू, अशी ग्वाही अनिल परब यांना दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले. एसटी कर्मचाऱयांच्या शिष्टमंडळानेही फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप पूर्णपणे एसटी कर्मचाऱयांच्या पाठिशी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
संपकरी एसटी कर्मचाऱयांना महामंडळाकडून अल्टीमेटम देण्यात आला आहे. कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असे या नोटीशीत म्हटले आहे. हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92,266 इतकी आहे. तर सध्या कामावर हजर झालेल्या कर्मचाऱयांची संख्या केवळ 7541 आहे. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी 5205, कार्यशाळा कर्मचारी 1925, चालक 258 आणि वाहक 153 आहेत.
कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल.
गर्दीशी चर्चा होऊ शकत नाही
हा संप थांबला पाहिजे आणि तडजोड झाली पाहिजे. पण संपकऱयांनी पहिला निर्णय घ्यावा की जेवढय़ा संघटना आहेत त्यांनी बाजूला व्हावे. शेवटी कुठल्याही आंदोलनात कुणी तरी नेतृत्व करत असतो पिंवा एखादी संघटना असते. त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवता येतो. गर्दीशी चर्चा होऊ शकत नाही. संपावर तोडगा काढण्यासाठी त्यात लक्ष घालण्याची आम्हा काही लोकांची तयारी आहे. विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही ही भूमिका थोडी अडचणीची आहे हे लक्षात घेतले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.




























































