वानखेडेंविरोधात 9 डिसेंबर पर्यंत कोणतेही वक्तव्य करणार नाही, नवाब मलिक यांची न्यायालयात हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वानखेडेंविरोधात 9 डिसेंबर पर्यंत कोणतेही वक्तव्य करणार नाही अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दिली आहे. नवाब मलिक हे एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे व कुटुंबीयांवर वारंवार आरोप करून बदनामी करत असल्याने त्यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखावे अशी ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने फेटाळून लावल्याने याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या समोर सुनावणी पार पडली.

न्यायमूर्ती माधव जामदार यांनी याबाबत निकाल जाहीर करत ज्ञानदेव वानखेडे यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. वानखेडे यांना खासगी आयुष्याविषयी मूलभूत हक्क असला तरी मलिक यांनाही व्यक्त होण्यासाठी घटनेने स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, असे म्हणत वानखेडे यांची मागणी फेटाळली. या निर्णयाला ज्ञानदेव वानखेडे यांनी द्विसदस्यीस खंडपीठासमोर ऍड. दिवाकर राय यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी गुरुवारी निश्चित केली.