
वेंगुर्ले तालुक्यातील चिपी परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ परिसरात होणाऱया कोल्हेकुईनंतर आता बिबटय़ाची डरकाळी ऐकायला येऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षक भिंतीवरून बिबटय़ाने थेट विमानतळावर एण्ट्री केली. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी अधिक वाढली आहे. दरम्यान विमान धावपट्टीवर उतरवत असताना परिसरातील गवतात कोल्ह्यांचे वैमानिक व प्रवाशांना हमखास दर्शन होत आहे.
सिंधुदुर्ग विमानतळावरून दररोज एक विमान सिंधुदुर्ग ते मुंबई परतीचा प्रवास होतो. या विमानतळ परिसरात कोल्ह्यांचा रोज वावर असतो. मंगळवारी सायंकाळी संरक्षक भिंतीवरून उडी मारत बिबटय़ाने विमानतळ परिसरात प्रवेश केल्याचे सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडले. अखेर ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहोचताच वरिष्ठांच्या आदेशाने परिसरातील खुल्या गवताळ भागात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र थांगपत्ता लागला नाही, तरीदेखील येथील कार्यरत कर्मचाऱयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
कोल्ह्याची पिंजऱयाकडे पाठ
काही दिवसांपूर्वी कोल्ह्याच्या एण्ट्रीमुळे विमानतळ प्रशासन मेटाकुटीला आले आहे. कोल्ह्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागानेही विमानतळ आवारात चाचपणी केली. प्रत्यक्ष पाहणी करून कोल्हे कुठून येतात? कधी येतात? का येतात? याची परिपूर्ण माहिती घेतली व कोल्ह्याच्या बंदोबस्तासाठी एक पिंजराही ठेवला, मात्र कोल्ह्याने त्या पिंजऱयाकडे जाणेही टाळले.























































