
बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश ही देशातील सर्वात गरीब राज्ये ठरली आहेत. नीती आयोगाचा पहिला बहुआयामी गरीबी निर्देशांक (एमपीआय) अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात देशातील राज्यांमधील गरीबीचे प्रमाण देण्यात आले आहे.
एमपीआय अहवालानुसार बिहारमधील 51.91 टक्के लोकसंख्या ही गरीब आहे. झारखंडमधील 42.16 टक्के तर उत्तर प्रदेशातील 37.79 टक्के लोक गरीब आहेत. या क्रमवारीत मध्य प्रदेश (36.65 टक्के) चौथ्या तर मेघालय (32.67 टक्के) पाचव्या क्रमांकावर आहे.
केरळ, गोवा, सिक्कीम आणि तामीळनाडू या राज्यांमध्ये गरिबीचे प्रमाण देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. केरळमध्ये 0.71 टक्के, गोव्यात 3.76 टक्के, सिक्कीममध्ये 3.82 टक्के तर तामीळनाडूत 4.89 टक्के लोक गरीब आहेत.
पेंद्रशासित प्रदेशांमधील गरिबीचे प्रमाणही या अहवालात देण्यात आले आहे. दादरा नगर हवेली 27.36 टक्के, जम्मू-कश्मीर आणि लडाख 12.58 टक्के, दमण आणि दीव 6.82 टक्के आणि चंदिगड 5.97 टक्के गरीब असल्याचे त्यात नमूद आहे. पुडुचेरीतील 1.72 टक्के, लक्षद्वीप 1.82 टक्के, अंदमान-निकोबार 4.30 टक्के आणि दिल्लीतील 4.79 टक्के लोक गरिबीरेषेखालील आहेत.
बिहारमध्ये कुपोषितही सर्वाधिक
देशात सर्वाधिक कुपोषित नागरिक हे बिहारमध्ये असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यानंतर कुपोषित राज्यांच्या क्रमवारीत झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढचा क्रमांक लागतो. मातेचे आरोग्य, शालेय शिक्षण, शाळांमधील उपस्थिती, स्वयंपाकासाठी इंधन आणि विजेचा वापर आदींपासूनही बिहारमधील मोठी लोकसंख्या वंचित असल्याचे हा अहवाल सांगतो.




























































