
अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. विकी व कतरिना लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र या दोघांनीही कधीच त्यांच्या अफेयरबाबत अधिकृतरित्या सांगितलेले नव्हते. मात्र दोघांच्या घरात लगीन घाई सुरू असल्याच्या बातम्यांना जोर आला होता. पण आता लग्नाची तारीख नक्की झाल्याचं वृत्त आहे.
कतरिना व विकी हे येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर इथला एक पुरातन राजवाडा त्यांनी लग्नासाठी तीन दिवस बुक केलेला आहे. 7 ते 9 डिसेंबर पर्यंत त्यांच्या विवाहसोहळा पार पडणार आहे. 7 आणि 8 तारखेला मेहंदी आणि संगीत कार्यक्रम असणार असून 9 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने विवाह पार पडणार आहे.
या लग्नात फक्त काही मोजकेच पाहुणे सहभागी होणार आहेत. राजस्थानमध्ये या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. विमानाची तिकिटं आणि पाहुण्यांसाठी राहण्याची सोय करण्यात विकी आणि कतरिनाच्या टीम्स व्यग्र आहेत. सुमारे 200 पाहुणे या लग्नात सहभागी होतील. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रानंतर सर्वाधिक चर्चेत असलेला हा विवाह सोहळा आहे.
कतरिना व विकी यांच्या लग्नाची तयारी जरी जोरदार सुरू असली तरी ते लग्नानंतर लगेच पुन्हा कामाला लागणार असल्याचे समजते. आधीच ठरलेल्या शूटींगच्या तारखांमुळे या दोघांना हनीमूनलाही जाता येणार नसल्याचे बोलले जात आहे.



























































