
भाजप आता हतबल झालाय, दोन वर्षांनंतरही त्यांना सरकार पाडता आले नाही. आमदार खरेदीचा कार्यक्रम करता आला नाही. विरोधी पक्षाची गँग अयशस्वी ठरली, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्षाची गँग अयशस्वी झालीय. भाजपमध्ये आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणवीसांना हटवायचंय? असा प्रश्न पडलाय. भाजपमध्ये अंतर्गत नवे विरुद्ध जुने वाद निर्माण झाले होते. फ्रॉड लोकांना सोबत घेऊन फडणवीस राजकारण करत होते. ज्यांना फडणवीसांनी साइडलाइन केले होते असे तावडेंसारखे नेते आता पेंद्रात मोठय़ा पदावर गेले आहेत. यावरून दिसतंय की साइडलाइन केलेल्यांना पुन्हा पुढे आणायचेय. त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व काय तो निर्णय घेईल, असे नवाब मलिक म्हणाले.
राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी होणार
पक्षातून गेलेल्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमधून अनेक नेते परत येतील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.



























































