
सुमारे पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उद्यापासून हिंदुस्थान आणि पाहुण्या न्यूझीलंड संघांत दुसरी कसोटी रंगणार आहे. मात्र या कसोटीचे भवितव्य आता अवकाळी पडणाऱया पावसाच्या इच्छेवर अवलंबून असणार आहे. गेले दोन दिवस कोसळणाऱया पर्जन्य सरींनी मुंबईला पार चिंब करून टाकले आहे. त्यामुळे उद्या पावसाने विश्रांती घेतली तरच दुसऱया कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ उपाहारापर्यंत सुरू होऊ शकेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस खेळपट्टी आणि आऊटफिल्ड व्यवस्थित राखण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. बुधवारी रात्रीही डॉ. पाटील यांनी मैदानाची पाहणी करीत एमसीएच्या कर्मचारीवर्गाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती एमसीए मैदान समितीचे चेअरमन नदीम मेमन यांनी दिली.
मुंबईतील कसोटी लढतीत पूर्वी विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्या कामगिरीवर बहुधा हिंदुस्थानी संघाचे भवितव्य अवलंबून असायचे. पण आता उद्या पावसकर (वरुणराजा) कशी बॅटिंग करतो यावर वानखेडे स्टेडियमवरील दुसऱया कसोटीचे भवितव्य अवलंबून असेल. पाऊस थांबला आणि ऊन पडले तरच पहिल्या दिवसाचा खेळ शक्य होईल, अन्यथा सारे काही निसर्गराजाच्या हाती असेल अशी भावना एमसीए मैदान समितीचे प्रमुख नदीम मेमन यांनी बोलून दाखवली. एमसीएच्या कर्मचारीवर्ग वानखेडेची खेळपट्टी आणि आऊटफिल्ड खेळण्यास योग्य ठेवण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत, असेही मेमन म्हणाले.
विराटच्या शतकी खेळीची उत्सुकता
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली गेली दोन वर्षे कसोटीत शतकी खेळी करू शकलेला नाही. विराटच्या कसोटी शतकांचा दुष्काळ मुंबईत संपेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. वानखेडे स्टेडियमवर विराटने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 72.17 च्या सरासरीने एकूण 433 धावा नोंदवल्या आहेत. त्याच्या या 6 खेळींत एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 2016 मध्ये या मैदानावर विराट इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अखेरचा खेळला होता तेव्हा त्याने 340 चेंडूंत 235 धावांची मॅरेथॉन द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळेच मुंबईत विराटची बॅट पुन्हा तेजाने तळपेल आणि आपल्याला एक शानदार शतक पाहायला मिळेल अशी हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांची अपेक्षा आहे. आपली कारकीर्दीतील पहिली कसोटीही विराट वानखेडेवरच खेळला होता. त्याने त्या लढतीत दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली होती.
‘सध्या आमचे लक्ष आम्ही मुंबईतील दुसऱया कसोटीवर केंद्रित केले आहे. कारण कानपूरला विजय हातून निसटल्यावर मुंबईत यश मिळवून मालिका विजय साजरा करण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. दक्षिण आफ्रिका दौऱयाबाबत परिस्थिती स्पष्ट झाल्यावर त्याबाबत बोलणे ठीक ठरेल, आता नाही.’
– विराट कोहली, टीम इंडियाचा कर्णधार
टीम इंडियाने केला बीकेसीत इनडोअर सराव
बहुप्रतिक्षित मुंबई कसोटीसाठी मुंबईत दाखल झालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण मुंबईतील आपल्या निवासी हॉटेलपासून तब्बल 18 किमी प्रवास करीत सकाळी वांद्रे येथील बीकेसी इनडोअर स्टेडियम गाठले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाच्या क्रिकेटपटूंनी सुमारे दोन तास इनडोअर सराव केला. हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाच्या विनंतीवरूनच हे सर्व सत्र आयोजित केले होते, अशी माहिती एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी दिली. पाहुण्या न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंननी मात्र आज हॉटेलच्या जलतरण तलावात पोहण्यात आपला वेळ घालवल्याचे वृत्त आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता शुक्रवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. हीच मुंबई कसोटीसाठी दिलासादायक बातमी आहे.




























































