मोठी बातमी – हिंदुस्थानमध्ये ‘ओमायक्रोन’चा तिसरा रुग्ण सापडला, केंद्रसरकार अलर्ट मोडवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाला धडकी भरवणारा कोरोनाचा नवा अवतार ओमायक्रोचा (Omicron) आणखी एक रुग्ण हिंदुस्थानमध्ये आढळला आहे. गुजरातच्या जामनगर येथील व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झाली आहे. हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकन देश झिम्बाब्वेहून हिंदुस्थानमध्ये आला होता. ओमायक्रोनचा देशातील हा तिसरा रुग्ण असून याआधी कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळले होते.

जामनगर येथील हा रुग्ण दोन दिवसांपूर्वी झिम्बाब्वेवरुन गुजरातमध्ये परतला होता. विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीमध्ये या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याच्या स्वॅबचा नमुना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आल्यानंतर या व्यक्तीला ओमानक्रोन व्हेरिएंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

ओमायक्रोनची लागण झालेल्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत हा व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 10 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

दरम्यान, ओमायक्रोनचा तिसरा रुग्ण सापडल्यानंतर केंद्र सरकार आणि गुजरात सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने एक बैठक घेतली. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी काही लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

रुग्ण वाढण्याची शक्यता

हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत ओमायक्रोनचे तीनच रुग्ण सापडले असले तरी यात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 30 लोकांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल येणे बाकी आहे.