
कोरोना महामारीचा एक नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन हा सध्या सर्व जगाला भेडसावत आहे. हिंदुस्थानात कर्नाटक राज्यात या व्हेरियंटचा शिरकाव झाला असल्याच्या वृत्तादरम्यानच 69 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळत आहे.
कर्नाटकमधील चिकमंगळुरू जिल्ह्यातल्या नवोदय विद्यालयाचे 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, दुसरीकडे शिवमोगा येथील एका शाळेच्या 29 विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना कोरोनाचं कोणतंही लक्षण आढळलेलं नाही.
ओमायक्रॉनच्या दहशतीमुळे येथील अनेक शाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या चाचण्यांमध्ये हे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांचीही चाचणी करण्यात येणार आहे. तसंच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8895 नवीन रुग्ण सापडले आहेत. 2796 रुग्णांचा मृत्यू झाला असून यासोबत देशातील आजवरच्या कोरोना संक्रमितांची संख्या 3,46,33,255 इतकी झाली आहे. कोरोनाच्या विळख्यात येऊन मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडादेखील वाढला असून आता ही संख्या 4,73,326 इतकी झाली आहे.


























































