
ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या शिरकावाने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून कराड शहरातील नगरपरिषद कार्यालय, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत या ठिकाणी आता लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रशासनाने याबाबत प्रवेशद्वारावरच सूचना लावली असून लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच नागरिकांना कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.
ओमायक्रॉन व्हेरीएंटने देशभरात शिरकाव केल्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तर महाराष्ट्रात ही रुग्ण संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारी म्हणून काही उपाययोजना प्रशासनाला राबवण्यास सांगितले आहे. त्यामुळे संबंधित सरकारी कार्यालयात तसेच गर्दी होणार्या ठिकाणी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याच्या सूचना अमंलात आणल्या जात आहेत. याशिवाय आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात येत असून यामधून ज्या व्यक्तींनी लस घेतली नाही याची माहिती संकलित केली जात आहे.
कराड येथील नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावरच लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाईल अशी सूचना लावण्यात आली असून लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच नगरपालिकेत नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार कचेरीत ही प्रवेशद्वारावर सूचना लावली असून लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहून नागरिकांना आपल्या कामासाठी कार्यालयात सोडले जात आहे. ज्यांच्याकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांची अडचण होत आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र नसल्याने अनेकांना कार्यालयाच्या बाहेरच ताटकळत बसावे लागले आहे.























































