
एसटी कामगारांच्या पगारात राज्य सरकारने केलेली 41 टक्के वाढ अखेर मंगळवारी त्यांना त्यांच्या पगारातच थेट दिसली. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. एसटी कामगारांना लागू केलेल्या सुधारित वेतनवाढीसह मंगळवारी अखेर त्यांच्या खात्यावर पगार जमा झाल्याने आंदोलनाची धार कमी होईल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या राज्यभरातील 250 पैकी 127 आगारांतील वाहतुकीला सुरुवात झाली असून त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील वाहतूक सुरू होत त्यांना दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाच्या संपाला रोखण्यासाठी परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी 41 टक्के पगार वाढ जाहीर केली होती. परब यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटी कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून शासकीय कर्मचाऱयांप्रमाणे 28 टक्के करण्यात आला आहे. घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढण्यात आला आहे. तसेच अंतरिम वाढ देखील देण्यात आली आहे. त्याप्रमाणे नियमित कामावर हजर असणाऱया कर्मचाऱयांच्या खात्यावर (नोव्हेंबरचे वेतन देय डिसेंबर) जमा करण्यात आले आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अनुकंपा नोकरीचा आधार
कोरोनाकाळात वेतनाशी निगडित अशा कारणावरूनच एसटी कामगाराने आत्महत्या केली असेल, तर त्यानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात महामंडळाने चाचपणी सुरू केली आहे. मार्च 2020 ते आतापर्यंत 38 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. या संदर्भात चाचपणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी अधिकाऱयांना दिल्याचे समजते.
19,995 कर्मचारी डय़ुटीवर हजर
एसटी महामंडळाच्या सायं. 5 वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार 127 आगारांची वाहतूक सुरू करण्यास यश आले आहे. उद्या सकाळपर्यंत 150 च्या वर आगारांतील वाहतूक सुरू होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आज मंगळवार 7 डिसेंबर रोजी महामंडळाचे 19,995 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले आहेत. यात प्रशासकीय विभागाचे 9,315 कर्मचारी, कार्यशाळेचे 6,312, चालक 2,319 आणि वाहक 2,049 अशा कर्मचाऱयांचा समावेश आहे. दरम्यान, आज 135 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले असून एकूण निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱयांची संख्या आता 9,910 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 2014 कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.



























































