
देशातील न्यायालयांमध्ये कोटय़वधी केसेस प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात 70 हजार 38, उच्च न्यायालयांत 58 लाख 79 हजार 285, कनिष्ठ न्यायालयांत चार कोटी 94 लाख चार हजार 405 खटले प्रलंबित आहेत. कोर्टात तारखांवर तारखा पडतात, पण न्याय मिळत नाही. न्यायालयांत हजारो पदे रिक्त असताना सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेत केला.
न्यायाधीश वेतन व सेवा शर्ती विधेयकावर बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी मत मांडले. एकीकडे न्यायाधीशांचे वेतन वाढवले जात आहे, मात्र दुसरीकडे न्यायालयांमध्ये पाच हजार पाचशे पदे रिक्त आहेत. पदे कधी भरणार याला वेळेचे कुठेच बंधन नाही. त्यामुळे सर्वसामन्यांच्या वाटय़ाला केवळ तारीख पे तारीखच येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालय न्याय कधी देणार असाही प्रश्न विचारला. बॉम्बेचे मुंबई करायला अनेक वर्षे जावी लागली, मात्र बेळगावचे बेळगावी एका फटक्यात झाले हा सापत्नभाव कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

























































