
सोलापूर जिल्हा परिषदेने ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील मुलींकरिता ‘सायकल बँक’ सुरू केली आहे. या सायकल बँकेच्या वतीने सोमवारी 50 सायकलींचे वितरण करण्यात आले. मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः एक सायकल देऊन या उपक्रमाची सुरुवात केल्याने लोकप्रतिनिधींकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ हा उपक्रम ग्रामस्थ, शिक्षक व पालक यांच्या सहकार्यातून राबवीत शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील मुलींकरिता ‘सायकल बँक’ सुरू केली आहे. या उपक्रमाची सुरुवात माळशिरस तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः एक सायकल देऊन या बँकेची मुहूर्तमेढ रोवली. या प्रेरणेतून अनेकांनी हातभार लावत अवघ्या काही दिवसांत 50 सायकली जमा झाल्या. या सायकलींचे वितरण सोमवारी केले. या उपक्रमाला अनेक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमदार राम सातपुते यांनी स्वच्छ व सुंदर शाळांसाठी 10 लाखांचा निधी जाहीर केला आहे. जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील यांनी या सायकल बँककरिता पुढाकार घेतला आहे. जिह्यात पहिल्यांदाच सायकल बँक स्थापन करून ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱया मुलींकरिता केलेली ही मदत खूपच चांगली ठरली आहे.
साडेसहा कोटी लोकवर्गणीतून जमा
जिल्ह्यात शाळांचा कायापालट होत असून, स्वच्छ व सुंदर शाळेसाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले आहेत. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून 10 लाख बालकांची आरोग्य तपासणी करणारा सोलापूर हा एकमेव जिल्हा आहे.



























































