
नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसार 7 तारखेला पगार झाल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱयांची संख्या थोडी वाढली असून बुधवारी एसटी महामंडळाचे 20,130 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले आहेत. तर आज 135 आगारांतील वाहतूक अंशतः सुरू करण्यात यश आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता आणि शालेय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
एसटी महामंडळाच्या डय़ुटीवर हजर कर्मचाऱयांचा नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार झाल्यानंतर एसटी कर्मचाऱयांना त्यांचा वाढलेला पगार ‘वेतन चिठ्ठी’वर दिसल्याने अनेक कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. काल 19,995 असलेली कामगारांची संख्या आज बुधवारी 20,130 झाली आहे. यात चालकांची संख्या 2,417 तर वाहकांची संख्या 2,223 इतकी आहे. तर एसटीवर दगडफेकीच्या घटनांप्रकरणी आतापर्यंत शंभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 10,030 कर्मचारी निलंबित
एसटीचा संप औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्याने संपात सहभागी कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई सुरू असून आतापर्यंत एसटीच्या 10,030 कर्मचाऱयांना निलंबित केले गेले आहेत, तर 2,026 कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर अनेक कर्मचाऱयांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत असून आतापर्यंत 1,996 कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.



























































