लेख – बांगलादेश युद्धाचे शिल्पकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

1971 मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला 14 दिवसांत शरण आणताना फिल्डमार्शल सॅम माणेकशा यांनी निर्धार, खंबीर वृत्ती या गुणांचा परिचय दिला. आजपर्यंत कोणत्याही हिंदुस्थानी लष्करी अधिकाऱयाला जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी माणेकशा यांना मिळाली. अर्थात त्यांच्या युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुणांमुळेच. युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती सेनापतींनी आखलेल्या या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्याप्रमाणे युद्धनीती आखणारे माणेकशा एक सेनापती होते. फिल्ड मार्शल माणेकशा हे स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासामधले सर्वात यशस्वी असे सेनानी होते.

बांगलादेश मुक्तिसंग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे हिंदुस्थानी सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा हे ‘सॅम बहादूर’ या नावानेही परिचित आहेत. 3 एप्रिल 1914 साली जन्मलेल्या माणेकशा यांनी आपल्या 40 वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबत 1962 साली झालेल्या युद्धांमध्ये वेगवेगळ्या पदावर भाग घेतला.

दुसऱया महायुद्धातील जपानबरोबरील बर्मा युद्धात पॅगोडा हिल्सवर ताबा मिळवताना माणेकशा यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या. लढाईत अतुलनीय पराक्रम गाजवत असताना ते गंभीररीत्या जखमी झाले होते. शस्त्र्ाक्रिया कक्षात नेल्यानंतर जगण्याची शक्यता कमीच असल्यामुळे सर्जननी मी तुमची शस्त्र्ाक्रिया करणार नाही असे मोठय़ा आवाजात सांगितले. एवढय़ात माणेकशा शुद्धीवर आले होते म्हणून तिथून जाण्यापूर्वी सर्जननी त्यांना विचारले की अशी अवस्था तुमची कशामुळे झाली? त्यावेळी शुद्धीवर आलेले माणेकशा म्हणाले, ‘मला गाढवाने लाथ मारली म्हणून माझी ही अवस्था झाली.’ मरणाच्या दारात असताना त्यांचे उत्तर ऐकून सर्जनला धक्का बसला व त्यांची लढाऊ वृत्ती बघून त्यांनी शस्त्र्ाक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्र्ाक्रिया यशस्वी झाली आणि इतिहास घडला.

तुम्ही युद्धाला तयार आहात का?

1971 मध्ये युद्ध अटळ असल्याची चिन्हं दिसू लागल्यानंतर हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशा यांना तुम्ही युद्धाला तयार आहात का, असा प्रश्न विचारला. तेव्हा सॅम माणेकशा यांनी दिलेले उत्तर होते, “नाही, सध्या आर्मर्ड डिव्हिजन आणि इन्फन्ट्री डिव्हिजन्स वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्याकडे युद्धासाठी तयार असलेले केवळ 12 रणगाडे आहेत, दारूगोळा पुरेसा नाही, सैन्याची अनेक शस्त्र्ाs स्पेअर पार्ट्स नसल्यामुळे नादुरुस्त आहेत, थोडय़ा दिवसांनी मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर नद्यांना पूर येऊ शकतो. तसे झाल्यास बांगलादेशात लढाई शक्य नाही. तयारी करण्याकरिता सैन्याला कमीत कमी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वेळ पाहिजे. याच काळात हिमालयात बर्फ पडल्यामुळे चीन पाकिस्तानची मदत करू शकणार नाही आणि चिनी सीमेवर असलेले सैन्य ईस्ट पाकिस्तानमध्ये आक्रमक कारवाई करता वापरता येईल.’’

हिंदुस्थानी सैन्यावर राजकीय नेतृत्वाचा प्रचंड दबाव होता की, युद्ध लगेच एप्रिल महिन्यामध्ये सुरू करावे, परंतु सॅम माणेकशा यांनी सांगितल्यानंतर काही तज्ञांनी त्यांच्याविरुद्ध एक अपप्रचार मोहीम सुरू केली आणि असा पण सल्ला देण्यात आला की, जर हिंदुस्थानी सैन्य युद्धाकरिता तयार नसेल तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला पाकिस्तानी सैन्याला बांगलादेशमधून हाकलण्याचे काम द्यावे. त्यावेळी सॅम माणेकशा यांनी आपल्या पदाचा राजीनामाही देऊ केला होता. तेव्हा इंदिरा गांधींनी माणेकशा यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारत सरकारने आता काय करावे, असा सल्ला मागितला. त्यावर सॅम माणेकशा यांनी इंदिरा गांधीना आमच्या अटींवर युद्ध लढण्याची मोकळीक द्यावी. इंदिरा गांधी यांनी सॅम माणेकशा यांचा प्रस्ताव मान्य केला आणि एक मोठा विजय मिळवण्यात आला.

युद्धकाळात सैन्याचे नेतृत्व

बांगलादेश युद्धात अनेक अभिनव डावपेचाचा वापर झाला. जसे दुसऱया महायुद्धानंतर प्रथमच टांगेलमध्ये झालेला हिंदुस्थानी सैन्याचा एअर ड्रॉप, हेलिकॉप्टरच्या मदतीने बंगलादेशमधल्या नद्या पार करणे किंवा मोठय़ा शहराजवळ असलेल्या किल्ल्यांवर हल्ला न करता त्यांच्या मागे जाऊन त्यांचा परत जायचा रस्ता अडवणे इत्यादी. बांगलादेशमध्ये सैन्याची हालचाल करण्याकरिता घोडे, रिक्षा, बैलगाडय़ा आणि अशा अनेक अभिनव वाहनांचा वापर केल्यामुळे आणी सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्य भांबावून गेले आणि कुठेही त्यांना चांगल्या पद्धतीने लढाई करता आली नाही.

या युद्धामध्ये आपल्या सक्षम युद्धनेतृत्वाने माणेकशा यांनी पाकिस्तानी सैन्याला आऊट जनरल केले .खरोखरच या युद्धातील यशाचे ते एक सर्वात मोठे शिल्पकार होते. 3 डिसेंबर 1971 रोजी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध सुरू झाले होते. 16 डिसेंबरपर्यंत हे युद्ध सुरू होते. हिंदुस्थानी सैन्याच्या महापराक्रमामुळे अवघ्या 14 दिवसांत पाकिस्तानने गुडघे टेकले. या युद्धात फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

नऊ दिवसांच्या युद्धानंतर 13 डिसेंबरला सॅम माणेकशा यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला म्हटले की, ‘एकतर तुम्ही शरण या, अन्यथा आम्ही तुमचा खात्मा करू. हिंदुस्थानी सैन्याने तुम्हाला चारही बाजूंनी घेरले आहे. चितगाव, चालना आणि मांग्ला बंदरांशी तुमचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तेथून तुम्हाला मदत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. मुक्ती वाहिनी आणि बाकी लोक बदला घेण्यासाठी तयारच आहेत. तुम्ही स्वतःच्या सैनिकांचा जीव का धोक्यात टाकत आहात? तुम्हाला घरी जायचे नाही का? आपल्या मुलाबाळांसोबत राहायचे नाही का? त्यामुळे वेळ दवडू नका, शस्त्र खाली टाका. आम्ही तुम्हाला एका सैनिकाप्रमाणे वागणूक देऊ,’ असे सॅम माणेकशा यांनी रेडिओ मेसेजमध्ये म्हटले होते. खरे म्हटले तर त्यावेळी पाकिस्तान सैन्याची युद्धक्षमता शाबूत होती आणि त्यांना अजून अनेक दिवस युद्ध लढता आले असते व हिंदुस्थानला अजून अनेक सैनिकांचे रक्त सांडावे लागले असते. पण या मानसिक दबावामुळे पाकिस्तान मनात युद्ध हरले आणि माणेकशा यांच्या या इशाऱयानंतर 16 डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने पांढरे निशाण फडकावले. कमीत कमी रक्त सांडून युद्ध जिंकणे यालाच युद्धनेतृत्व म्हणतात. 27 जून 2008 रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात माणेकशा यांचे निधन झाले. सॅम यांच्या अंत्यसंस्काराला कोणताही राजकीय नेता उपस्थित राहिला नाही किंवा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला नाही ही राष्ट्रीय शोकांतिकाच म्हणावी लागेल.