
थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले माथेरान आज निर्घृण हत्येने हादरून गेले. इंदिरानगर परिसरातील एका घरगुती लॉजवर विवस्त्र अवस्थेतील पर्यटक महिलेचे धड सापडले असून चिरलेले मुंडके घेऊन नराधम प्रियकर पळाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, फरार झालेल्या माथेफिरूचा शोध घेण्यासाठी नेरळ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
माथेरानच्या इंदिरानगर येथील एका घरगुती लॉजवर शनिवारी एक जोडपे राहण्यासाठी आले होते. नियमाप्रमाणे लॉजिंगच्या मालकाने या दोघांची नावे रजिस्टरमध्ये नोंद करतानाच ओळखपत्रेही तपासून रूम दिली. मात्र आज सकाळी साफसफाईसाठी गेलेल्या लॉजच्या कर्मचाऱयाला दरवाजा उघडा दिसल्याने तो आतमध्ये गेला. त्यावेळी कॉटखाली या पर्यटक महिलेचा शिर नसलेला धड आढळून आला. धक्कादायक म्हणजे या महिलेचे मुंडके व कपडे घेऊन नराधम प्रियकर पळाला आहे. या घटनेने सर्वच हादरून गेले असून पोलिसांनी रजिस्टरमधील नोंदी तपासल्या असता दोघांचीही नावे व पत्ता खोटा असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.
































































