‘बेफिकीर’ नागरिकांच्या चेहऱ्यावरून मास्क गायब, नगर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मास्कसह अन्य काही निर्बंधही जारी करण्यात आले आहेत. मात्र, मास्कच्या बाबतीत नागरिक बेफिकीर असून, कारवाई होत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला मनपा व पोलीस यंत्रणांकडून वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचे दिसत आहे.

राज्यात ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे. ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मागील आठवडय़ात नवे निर्बंध जारी केले आहेत. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला मास्क बंधनकारक करण्यात आला असून, रुमालाला मास्क समजले जाणार नाही. रुमाल गुंडाळलेल्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांना 500 ते 50 हजार रुपये दंड केला जाणार आहे. परंतु शहरात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

नगर शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे, ही बाब दिलासादायक असली, तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. मात्र, नागरिकांच्या चेहऱयावर कोरोनाची भीती कमी झालेली दिसत आहे. परिणामी, मास्क वापरण्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. मास्क नसणाऱयांवर मनपा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. पोलीसही बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुमारे 90 टक्के नागरिकांच्या तोंडावरील मास्क गायब झालेला दिसत आहे.

स्वतःसह इतरांच्या जिवाशी खेळ

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेत अनेकांचे हाल झाले. लॉकडाऊनमध्ये कधी एकदाचे जीवन पूर्वपदावर येईल, असे प्रत्येकाला वाटत होते. शासनाने संसर्ग कमी झाला म्हणून निर्बंध शिथिल केले. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरलाच पाहिजे, या साध्या नियमाचे पालन शहरवासीयांकडून होत नाही. स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी एक प्रकारे खेळ सुरू आहे.

कोरोना नियमांच्या पालनाबाबत मनपा प्रशासन ढिम्म

‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध जारी केले आहेत. मात्र, मनपाकडून या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचे दिसत आहे. मास्क नसणाऱयांना, तसेच आस्थापनांना दंड आकारण्याचा आदेश आहे. मात्र, याबाबत कारवाई होताना दिसत नाही. कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी शहरात मनपाची पथकेसुद्धा सक्रिय नाहीत. त्यामुळे मनपाकडून काय खबरदारी घेतली जाते? हा प्रश्नच आहे.