वाट चुकलेला गवा पुन्हा कोल्हापूरच्या वेशीवर, वन विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाट चुकून शहराच्या पश्चिमेला आढळलेला गवा आज पूर्व बाजूला जाधववाडी, कदमवाडी परिसरात आढळला. दिवसभर गवा उसाच्या फडात होता. दरम्यान, गवा शहरात घुसून अनर्थ घडू नये, यासाठी वनविभागाची पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. गव्याला त्याच्या मूळ अधिवासात परत पाठविण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे.

गेल्या आठवडय़ात (गुरुवारी) पाडळी खुर्द गावातून कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहत, जामदार क्लब, गायकवाड वाडा, पंचगंगा घाट परिसरात पहाटेच दाखल झालेल्या गव्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर रात्री उशिरा या गव्याने पंचगंगा नदी पोहून पार केली होती. पाळीव जनावराप्रमाणे रहदारीचा रस्ता पार करत, वडणगे मार्गे हा गवा भुयेवाडी येथे पोहोचला होता. दरम्यान, गव्याला हुसकविण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याने झालेल्या धावपळीत गव्याच्या हल्ल्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे गव्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

रविवारी गव्याचा ठावठिकाणा लागला नव्हता; पण सोमवारी वडगाव परिसरात, तर काल भादोले, लाटवडे परिसरात तो आढळला होता. रात्री दोनच्या सुमारास शिये फाटा मार्गे आलेला हा गवा आज कोल्हापूर शहराच्या पूर्वेस जाधववाडी, कदमवाडी येथील शेतामध्ये नागरिकांना दिसला. वन विभागाने तत्काळ या ठिकाणी नागरिकांना येण्यास मज्जाव करून, कदम वाडीतील ऍपल सरस्वती हॉस्पिटल शेजारी बंदोबस्त तैनात केला. मानवी वस्तीत गवा घुसू नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. आज दिवसभर कदमवाडी, जाधववाडी परिसरातील उसाच्या शेतामध्येच गव्याने आसरा घेतल्याने आज संध्याकाळीच तो आलेल्या मार्गाने मार्गस्थ होईल, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱयांनी वर्तविला आहे.