लेख – बांगलादेश युद्ध आणि 7 मराठा लाइट इन्फन्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

1971 च्या बांगलादेशच्या लढाईमध्ये सात मराठा लाइट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगलादेशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला पुरते नमवले होते. मात्र त्यासाठी सात मराठा लाईट इन्फन्ट्रीने 31 जवानांना गमावले. 125 जवान गंभीर जखमी झाले. अर्ध्याहून अधिक जखमी होऊनही त्यांनी लढाई केली होती. युद्धानंतर शत्रूच्या एका पूर्ण ब्रिगेडने सात मराठा लाइट इन्फन्ट्रीसमोर आत्मसमर्पण केले.

बांगलादेश मुक्ती युद्धात सात मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देशासाठी दिले, त्यात हवालदार मनोहर राणे, पेडलान्सनाईक परशुराम रेवंडकर, शिपाई शंकर माने, पेडलान्सनाईक गणपत पार्चे, शिपाई बनसोडे, बाबू इंगळे, रमेश जगनाडे, तुकाराम करांडे, बलवान नरके, सुभेदार दौलतराव फडतरे, हवालदार बळीराम विचारे, लान्स हवालदार रामकृष्ण बोरलीकर, पेडलान्सनाईक आशाराम तानपुरे, शिपाई हनुमान कोलपे, शिवाजी जगदाळे, गणपत सकपाळ, विठ्ठल शिरसाट, अंकुश तारी, मनप्पा चव्हाण, रामचंद्र देसाई, रघुनाथ सावंत, व्यंकटराव देशमुख, महादेव परब, रमेश इंगवले, बाळकृष्ण जाधव, विजय कोतवाल यांचा समावेश आहे.

युद्धाच्या आधी 1969 मध्ये नागा बंडखोरांविरुद्ध लढताना मेजर आओ आणि हवालदार काशीनाथ बोडके यांना सेना मेडल पुरस्कार मिळाले. अनेक वर्षांनंतर कर्नल आओ जे नागा होते, त्यांचा मुलगा लेफ्टनंट शशी याने सात मराठामध्ये प्रवेश केला आणि आपल्या वडिलांप्रम्णे त्याने सात मराठाबरोबर वेगवेगळ्या युद्धभूमीवर वीस वर्षे पलटणमध्ये सेवा केली.

सात मराठाचे नेतृत्व कर्नल बिडकीकर यांनी केले. टूआयसी होते मेजर फडिन्स, ते इंदूरचे होते. पंपनी कमांडर होते मेजर निजामुद्दीन- मंगलोर. मेजर जाधव, मेजर काखानीस, कॅप्टन विजय पाटील यांनी चांगले काम केले. या युद्धात मेजर निजामुद्दीन यांच्या तोंडातून गोळी गेली होती, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणत असताना तोंड उघडल्यामुळे ते वाचले, जिवंत राहिले. सुबेदार प्रताप साळुंके यांच्या पायातून गोळी गेली, तरीही त्यावेळीही त्यांनी नेतृत्व केले. मेजर फडणीस यांनीही जवानांना धीर देत मार्गदर्शन केले.

ऑक्टोबर- नोव्हेंबर पलटणीला सिलिगुडीला, नंतर बागडोगराला जाण्याचा आदेश मिळाला. नंतर पाचागडवर हल्ला करावयाचे ठरले. युद्ध जरी 3 ते 16 डिसेंबर असे झाले असले तरी प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्येच सात मराठाने युद्धाला सुरुवात केली होती. त्यासाठी युद्धाच्या आधी शत्रूला त्रास देण्यासाठी हल्ला करायचा आणि शत्रूला विश्रांती घेऊ न देण्याचे काम केले. त्यात पाकिस्तानचे अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. शत्रूच्या सैनिकांमधील काहींनी आपले सामान सोडून पलायन केले.

त्यानंतर पाचागडला हल्ला करण्याचा आदेश मिळाला. मेजर कारखानीस साहेबांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची घोषणा दिली आणि मग युनिटने त्यांना प्रतिसाद देत पाचागडवर एकसाथ हल्ला केला. पाकिस्तान्यांनी पूल नष्ट केले तेव्हा नदीत गळाभर पाण्यातून जात वाटचाल केली व पुन्हा हल्ला केला. काही ठिकाणी हिंदुस्थानी लष्कराच्या अभियंत्यांनी लोखंडी पूल एका रात्रीत नीट करून देऊन पुढे जाण्यासाठी वाहनमार्गही सुकर केला होता.

पाचागडवर पहिला हल्ला 26 नोव्हेंबर 1971 रोजी केला. पंपनी पंमाडर मेजर कारखानीस व प्लॅटून कमांडर विष्णू पाटील होते. सायंकाळी संपर्क तुटला, ती तुकडी पाचागडच्या गोदामामागे लपली, नंतर पुढे मजल मारली. त्यात विष्णू पाटील लढाईत बेपत्ता झाले. ते सापडले नाहीत. तेथे पाकिस्तानने पूल तोडला होतो. पाण्यातून वाटचाल केली. सकाळी सात वाजता पाकिस्तानी तोफखाना चालू होता, तरीही पुढे लढत राहिलो. त्यात अनेक जवान जखमी झाले, अनेकांनी प्राणही गमावले. आणि त्यानंतर पाचागडवर कब्जा केला.

कांतानगर पुलावर हल्ला करण्यापूर्वी रणगाडय़ाबरोबर जाऊन हल्ला करून परतायचे असा बेत होता. त्यावेळी लान्सनाईक तुकाराम करांडे यांना शत्रूच्या बॉम्बहल्ल्यात प्राण गमवावे लागले. मात्र अशा प्रकारामुळे त्या रात्री जेवण करायची इच्छा होत नव्हती.

सुभेदार दौलतराव फडतरे आणि हवालदार मनोहर राणे यांनी जखमी झाले असतानासुद्धा आपल्या आपल्या प्लॅटूनचे नेतृत्व केले आणि हल्ल्यामध्ये यश मिळवले. मात्र त्यानंतर त्यात ते मृत्युमुखी पडले. शिपाई नारायण मालुसरे यांनी आपल्या अनेक जखमी सैनिकांना मागे आणून त्यांचे प्राण वाचवले, परंतु नंतर झालेल्या फायरिंगमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शिपाई जानू चव्हाण यांनी पंपनीवर जबरदस्त फायर करणाऱ्या शत्रूच्या मीडियम मशीनगनच्या बँकरला उद्ध्वस्त केले आणि हल्ल्यामध्ये सफलता मिळवली. मात्र त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दोघांनाही सेना मेडल या पुरस्काराने गौरवण्यात आले. या लढाईमध्ये कॅप्टन तांबे यांना सेना मेडल, सुभेदार दौलतराव फडतरे यांना सेना मेडल मरणोत्तर, हवालदार मनोहर राणे यांना सेना मेडल मरणोत्तर हे पुरस्कार मिळाले .याशिवाय शिपाई नारायण मालुसरे आणि शिपाई जानू चव्हाण यांना सेना मेडल या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

युद्धात डॉक्टर कॅप्टन तांबे हे सैनिकांना देवदूतच वाटायचे.  ते फायरिंग होत असतानाही जखमी सैनिकांवर उपचार करीत, अगदी प्रत्यक्ष युद्धाच्या ठिकाणी जाऊन, आघाडीवर जाऊन वैद्यकीय स्टाफला नेत त्यांनी उपचार केले होते आणि अनेकांचे प्राण वाचवले होते. त्यांना बघितले की, जखमी सैनिकांचे मनोबल एकदम वर जायचे. त्यांना धीर येत असे.

पाकिस्तानी सैन्याने लिहिलेल्या इतिहासामध्ये सात मराठा लाईट इन्फन्ट्रीचे नाव नोंदविण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाचागड आणि कांतानगरमध्ये सात मराठाने पुनः पुन्हा हल्ला करून आम्हाला हरवले. युद्धानंतर शत्रूच्या एक पूर्ण ब्रिगेडने सात मराठा लाईट इन्फन्ट्रीसमोर आत्मसमर्पण केले. पुढचे काही दिवस या युद्धपैद्यांना आपल्या ताब्यात ठेवायचे आणि त्यांची रक्षा करायची जबाबदारी सात मराठाला मिळाली होती. युद्ध संपल्यानंतर देशाचे त्या वेळचे संरक्षणमंत्री श्री. जगजीवनराम सात मराठाला भेटण्याकरिता खास आले होते. वीरगती प्राप्त झालेल्या सगळ्या सैनिकांना प्रणाम आणि श्रद्धांजली!

[email protected]