सिंधुदुर्गातलो ‘कारटो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर

कल्पना मलये यांची मालवणी भाषेतली ‘कारटो’ ही कादंबरी प्रत्येकाच्या लहान वयातील त्या खोडकर स्मृतींमध्ये घेऊन जाते आणि तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेतलेला असाल, तुम्हाला मालवणी भाषा समजत असेल तर नक्कीच प्रत्येक प्रकरणात पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. मालवणी भाषेतील तो गोडवा, ते हेलकावे आणि प्रेमळ साद नेहमीच प्रत्येकाला आपलीशी करते. त्यामुळे ही संपूर्ण मालवणी कादंबरी बालमनावर राज्य करणारी आहे. ‘कारटो’ म्हणजे वाईट गुण असलेला असे नाही, तर हे टोपण नाव इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षांच्या काशीनाथ रघुनाथ टोपले याचे, पण सगळेच त्याला प्रेमाने ‘पॅश’ असे म्हणतात.

काशीनाथ हे त्याच्या आजोबांचे ठेवलेले नाव असल्यामुळे घरातही त्याचे नाव सन्मानाने घेतले जाते. पॅशला तसे क्रिकेट खेळणे, झाडावर चढणे, दगडाने आंबे पाडणे, कनेरनीच्या झाडावर चढून सगळ्याच फुलांमधील मध एकट्याने खाणे, घरातील वस्तूदुरुस्तीत पुढाकार घेणे अशा वेगवेगळ्या सवयी आहेत, पण खट्याळ – तेवढाच प्रेमळ, प्रामाणिक आणि हुशारही आहे. घरात कोलगेटची पेस्ट नसताना त्याच्या वडिलांनी आणलेली कोलगेट पावडर रात्री पाणी घालून ती भिजवून ठेवली, पण नाना आजोबांच्या नारदाच्या भूमिकेमुळे पितळ उघडे पडले आणि सकाळी अंथरुणातच मार पडला.

आपल्या घरात आलेली मावशीची मुलगी ती मुंबईवाली असल्यामुळे तिचा नट्टापट्टा होताच. ‘शामल’ नावाची ती मुलगी लिपस्टिक, तोंडावर पावडर, भुवयांवर काळी पेन्सिल फिरवता म्हणून पॅशही तशाच प्रकारचे पराक्रम करतो आणि आपली ‘आयब्रू’ घालवतो. ‘पावळेचा पानी पावळेकच जातला’ ही गोष्ट हा जाड्या राणे काकींना शाळेत प्रदर्शनासाठी एका प्लॅस्टिक बॉटलची गरज असते आणि आपल्या आईबरोबर राणे काकींचा परडा (परसबाग) झाडण्यासाठी पॅश जातो आणि तेथीलच एक रिकामी पडलेली बाटली त्याला हवी असते. याबाबत आईला सांगतो आणि त्यानंतर त्या राणे काकींच्या घरी जातो. आईने सांगितलेले असते तिला विचारूनच बाटली घेऊन जा, पण राणे काकी दुपारच्या झोपल्या असल्यामुळे तो न सांगताच ती बाटली घेऊन निघत असतो, मात्र त्यादरम्यान खिडकीतून राणे काकींची नजर त्याच्यावर पडते आणि चोर चोर म्हणून ती ओरडते. पॅशच्या घरी तक्रार करते.

त्यानंतर घडणारा किस्सा वेगळाच आहे. ‘लिना लिना आणि भिकार चिना’ या प्रकरणात वाडीत राहणारी एकटी बायोआजी पॅशकडून पत्र लिहून घेते. आलेली पत्र वाचून घेते, पण ही कारकुनी शाळेत आपल्या मित्राला त्याच्या मैत्रिणीसाठी चिठ्ठी लिहून केलेली मदत पॅशवरच परतली. कोणाचे म्हशी आणि कोणाक उठाबशी. वर्गात बाईंनी चिठ्ठीवरून सर्वांचे हस्ताक्षर तपासले. त्यात पॅशचे अक्षर जुळले आणि मग बऱ्यापैकी चोप मिळाला.

पॅश मात्र वागण्यात तेवढाच सजगही आहे. एकदा सड्यावरच्या तीर्थे काकूचे चोरीस गेलेले सोने मोठ्या चलाखीने सोडवले आणि ग्रामस्थांमार्फत त्या चोरट्यांना चांगली अद्दलही घडवली. ‘खेकट्याक मेकटा’ काय असते हे पॅश दाखवून देतो. पुढे मग अंधारात केला पण उजेडात इला, जखम मांड्येक, तूप शेंड्येक, केला तुला नि झाला माका, यवाजलेला सादात तर…, नदीआदी व्हानो काडलेले बरे असे प्रवाही कथानक आणि मालवणीचा अस्सल गोडवा असलेले हे लेखन वाचकांच्या नक्की पसंतीस उतरेल यात शंका नाही.

कारटो

लेखिका : कल्पना मलये

प्रकाशक : चैतन्य सृजन व सेवा संस्था आजरा

पृष्ठ : 96, मूल्य : रुपये 15/-