
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून ‘माझे असेही एक नाटय़संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुळ्ये यांच्या नाटय़संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. या वेळच्या संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी आहेत, तर विजय पेंकरे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दादर- माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे 23 डिसेंबरला दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत ‘माझे असेही एक नाटय़संमेलन’ पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवणारा जितेंद्र जोशी याला यावेळी ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’ यासाठी पटकथा लेखिका नमिता नाडकर्णी आणि मालिकेचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनाही ‘माझा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यानंतर प्रशांत लळीत यांच्या संगीत संयोजनाखाली मराठी-हिंदी गीतांची मैफल सादर केली जाणार आहे. संमेलन निमंत्रितांसाठी असल्याची माहिती अशोक मुळ्ये यांनी दिली.
n अशोक मुळ्ये म्हणजे हटके कार्यक्रमांची संकल्पना हे समीकरणच जणू. याआधी त्यांनी ‘असेही एक साहित्य संमेलन’ भरवले होते. त्यातून दिवाळी अंकांतून लिहिणाऱ्या नवोदित, होतकरू लेखकांना व्यासपीठावर आणून त्यांना सन्मान केला होता. गेल्या वर्षी त्यांनी ‘असेही एक नाटय़संमेलन… नाटककारांचे’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘माझा पुरस्कार’ नावाने ते स्वतः पुरस्कार देत असतात. या प्रत्येक कार्यक्रमात ‘सबकुछ’ अशोक मुळ्ये असतात.























































