
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे आता जगभरात चिंतेचे वातावरण आहे. याच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हिंदुस्थानातही फक्त पाच दिवसात याची रुग्ण संख्या 100 हुन थेट 200 इतकी म्हणजेच दुप्पट झाली आहे. सध्या देशातील 15 राज्यात ओमायक्रॉनचे 230 रुग्ण आहेत. यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ओमायक्रॉनचे रुग्ण जितक्या मोठ्या संख्येने सापडत आहेत, तितक्याच मोठ्या संख्येने याचे रुग्ण बरे देखील होताना दिसत आहेत. ओमायक्रॉनबाबत सतर्कतेचा इशारा देताना केंद्र सरकराने सर्व राज्यांना कोरोनाचा हा व्हेरिएंट डेल्टापेक्षाही अधिक गतीने परत असल्याचे सांगितले आहे.
2 डिसेंबर रोजी सापडला होता पहिला रुग्ण, 20 दिवसात रुग्ण संख्या 200 पार
देशात 2 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. त्या दिवशी कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये 2 लोकांना याची लागण झाली असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत याचे प्रमाण 110 पटीने वाढले आहे. याचे सर्वाधिक रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 65 आणि दिल्लीत 57 ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत.
देशभरात ओमायक्रॉन ज्या गतीने वाढत आहे याचा अंदाज या गोष्टीवरून लावता येईल की, 2 डिसेंबरला देशात ओमायक्रॉनचे 2 रुग्ण होते. मात्र 14 डिसेंबर रोजी याची संख्या 50 इतकी झाली. तर याच्या फक्त 4 दिवसानंतर याची संख्या 50 हुन 100 इतकी झाली. 17 डिसेंबर रोजी याची रुग्ण संख्या 100 होती, जी 21 डिसेंबर रोजी 200 हुन अधिक झाली आहे. फक्त पाच दिवसात याची रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे.




























































