
>> प्रसाद ताम्हनकर
मुलगा अथवा मुलगी म्हणून जन्माला येणे हे एक नैसर्गिक वरदान आहे. बालकाचा जन्म होण्याच्या आधीच त्यांचे लिंग ठरलेले असते. मात्र आता आधुनिक काळात, आपण विज्ञानाच्या क्षेत्रात इतकी उत्तुंग भरारी घेतलेली आहे की, ऑपरेशनच्या मदतीने मानव सहजपणे लिंग परिवर्तन करू लागला आहे. जगात सध्या असे अनेक लोक आहेत की, ज्यांनी आपले लिंग परिवर्तन (जेंडर चेंज) करून घेतले आहे, मात्र हे फक्त सर्जरीच्या मदतीने शक्य आहे. पण या जगात असेदेखील एक अद्भुत गाव आहे जिथे वयाच्या बाराव्या वर्षानंतर मुली या मुलामध्ये बदलतात आणि तेदेखील नैसर्गिकपणे. गोष्ट खोटी वाटते ना? पण सत्य आहे.
‘डोमिनिकन रिपब्लिक’ या देशातील ‘ला सेलिनास’ हे ते रहस्यमयी गाव होय. सध्या हे रहस्यमयी गाव मीडिया आणि सोशल मीडियामध्ये पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अवघी 6000 वस्ती असलेले हे छोटेसे गाव स्वतःमध्ये एक अद्भुत रहस्य दडवून बसले आहे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना या गावच्या रहस्याने आकर्षित केले आहे. मात्र आजही या नैसर्गिक लिंग परिवर्तनामागचे कारण ठोसपणे समोर येऊ शकलेले नाही. काही संशोधकांच्या मते, हा एक ‘आनुवंशिक आजार’ आहे, मात्र या आजाराबद्दल संपूर्ण संशोधन अजून अपूर्ण आहे.
या आजारामध्ये मुलगी म्हणून जन्माला आलेल्या काही बालकांच्या शरीरात हळूहळू पुरुष अवयव तयार व्हायला लागतात, त्यांचा आवाज अधिक घोगरा, पुरुषी व्हायला लागतो आणि त्यांच्या शरीररचनेत असे काही रहस्यमयी बदल घडतात; की जे त्यांना पुरुष बनवतात. अर्थात अशा आजाराने ग्रस्त असलेल्या बालकाला तिथला स्थानिक समाज मात्र अत्यंत घृणास्पद नजरेने बघतो, तसेच त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. अशा रोगग्रस्त मुलांना तिथे ‘ग्वेदोचे’ (Guevedoces) म्हटले जाते. स्थानिक बोली भाषेत हा शब्द ‘किन्नर’ या अर्थी वापरला जातो. वैद्यकीय परिभाषेत अशा रोगग्रस्तांना ‘सूडोहर्माफ्रडाइट’ (pseudohermaphrodite) म्हटले जाते.
स्थानिक लोक मात्र हा गावाला एक शाप आहे असे मानतात आणि अशा रोगग्रस्त बालकांना शापित मानले जाते. आपल्या घरात एखाद्या मुलीचा जन्म तर होणार नाही ना, या विचाराने गावातील लोक सतत धास्तावलेले असतात. आजही गावात एखाद्या घरात मुलीचा जन्म झाला, तर तो भयानक असा अपशकून मानला जातो आणि संपूर्ण घरावर एक भयाण वातावरण पसरते. परिवार, जवळचे नातेवाईक अत्यंत शोकाकुल होतात. या रोगाचा परिणाम म्हणजे या गावातील मुलींची संख्या ही अत्यंत कमी झालेली आहे. शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार ‘ला सेलिनास’ गावातील 90 बालकांपैकी प्रत्येकी एक बालक या रहस्यमयी आजाराशी सामना करते आहे. ‘हार्मोनल एंजाइम’च्या कमतरतेमुळे काही बालके पुरुष वा स्त्री अशा कोणत्याही लिंगाशिवाय जन्माला येतात आणि पुढे जाऊन काही कालावधीने मुलगी म्हणून जन्माला आलेले बालक मुलगा बनते असादेखील काही संशोधकांचा या गावातील रहस्याबद्दल दावा असून, त्या संदर्भात त्यांनी अधिक अभ्यास सुरू ठेवलेला आहे.
समुद्रकिनारी वसलेले ‘ला सेलिनास’ हे छोटेसे गाव आज आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक शाखांच्या विविध संशोधकांसाठी एक अभ्यासाचा, संशोधनाचा विषय बनलेले असले, तरी अजूनही या गावाच्या आसपासची गावे आणि तेथील रहिवासी यांची या गावाविषयीची भावना ‘शापित’ अशीच आहे आणि त्यांच्याकडून मिळणारी वागणूकदेखील.




























































