बोंडारवाडी धरणासाठी कादंबरी 10 कि. मी. धावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेढा जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरणाच्या कामास परवानगी मिळून धरण पूर्ण व्हावे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जावळी तालुक्यातील आसनी येथील छोटी धावपटू कादंबरी मोहन शेलार ही केळघर ते मेढा 10 किलोमीटर अंतर धावली. यावेळी 25 युवक व युवतींनीही सहभाग घेतला होता.

बोंडारवाडी येथे एक टीएमसी क्षमतेचे धरण व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून कृती समितीचे प्रयत्न सुरू आहेत. या धरणामुळे 54 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र, शासनाकडून कामाला गती मिळत नाही. या कामाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यस्तरीय ऍथलेटिक सुवर्णपदक विजेती 10 वर्षांची कादंबरी हिने केळघर ते मेढा हे 10 किलोमीटर अंतर धावत पार केले. यावेळी करंजे, चोरांबे, मामुर्डी या गावांतील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून कांदबरीच्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

बोंडारवाडी कृती समितीचे आदिनाथ ओंबळे, जगन्नाथ जाधव, श्रीरंग बैलकर, आदीनी हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी विनोद शिंगटे, विनोद पार्टे, एकनाथ सपकाळ, बजरंग चौधरी, मोहन जगताप, उषा उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कादंबरी हिच्या उपक्रमास जि. प. सदस्य दीपक पवार यांनीही पाठिंबा दिला.