
निष्ठावंत शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर उघडय़ावर आलेल्या त्यांच्या कुटुंबाला शिवसैनिकांनी भक्कम आधार दिला आहे. शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या वतीने रूईकर कुटुंबाला तत्काळ पाच लाख रुपये रोख मदत दिली आहे. त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा सगळा खर्च शिवसेना करणार असून घरही बांधून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना निरामय आरोग्य लाभावे, यासाठी सुमंत रुईकर हे एका मित्रासह बीडहून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पायी गेले होते. अर्ध्यावरच प्रकृती खराब झाल्यामुळे सुमंत यांना कर्नाटकातील रायचूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले. रविवारी त्यांच्यावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुईकर कुटुंबीयांसाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी 50 हजार रुपयांची मदत तत्काळ पाठविली आहे. शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱहे यांनीही आर्थिक मदत केली आहे. शिवसेना नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेणार असल्याचे जाहीर केले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सोमवारी त्यांच्या घरी जाऊन थेट आर्थिक मदत केली. परळीचे अभयकुमार ठक्कर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, किसान सेनेचे जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते यांनीही त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत केली.
रुईकर यांच्या पत्नीला नोकरीत कायम करणार
सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेमध्ये नोकरीला आहेत. कीर्ती रुईकर यांना सर्व तांत्रिक अडचणी बाजूला सारून नोकरीत कायम करून घेणार असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.



























































