तंत्रज्ञान : 2022

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कहाते

तंत्रज्ञान ही सातत्याने विकसित होणारी गोष्ट आहे. त्यातही अलीकडील काही वर्षांत तंत्रज्ञानात होणारे बदल अत्यंत वेगाने होत आहेत. त्याचा वेग एवढा आहे की, हे बदल माणसावर अक्षरशः आदळत आहेत. त्यात कोरोना महामारीची भर पडल्याने झपाटय़ाने बदलणारे विज्ञान-तंत्रज्ञान आणि माणूस हे नाते अधिक जवळचे झाले आहे. त्यादृष्टीने 2021 या वर्षात हा अनुभव आपण सगळय़ांनीच घेतला. या पार्श्वभूमीवर 2022 या वर्षात तंत्रज्ञानाचा विकास, बदल कसे आणि काय असतील, त्याचा धावता आढावा घेणारा लेख.

तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलांचा वेग सतत वाढत चाललेला असल्याचं म्हटलं जातं. आपल्याला हे जाणवतंही. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रकारे आपल्याला याचा अनुभव येतो. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडींमध्येही त्याचं प्रतिबिंब उमटत असल्याचं आपण अनुभवतो. स्वाभाविकपणे जसजसा काळ पुढे जात राहतो तसतसं या बदलांचं स्वरूप नेमकं कसं असेल आणि त्यांचा वेग आपल्याला अचंबित करून सोडणारा असेल का, असे प्रश्न आपल्याला पडतात. अर्थातच हा वेग प्रचंड असणार याविषयी कुणालाच शंका वाटण्याचं कारण नाही. हा वेग अफाट असणारच. त्याविषयी दुमत असणारच नाही. तरीही यामधली एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षिली जात असल्यामुळे तिच्याविषयी बोलणं गरजेचं ठरावं. ती म्हणजे आपल्यावर हे बदल अक्षरशः आदळत असल्याची आपल्याला भावना होत असली तरी खरं म्हणजे हे बदल तसे एका रात्रीत होत नसतात. त्यांचा प्रवास तसा आस्तेकदमच होत असतो. आपल्यापर्यंत त्यांचे परिणाम येईपर्यंत किंवा आपल्याला त्यांची जाणीव होईपर्यंत फक्त आपल्याला त्यांची पुरेशी कल्पना नसल्यामुळे आपल्याला ते एकदम घडल्यासारखं वाटतं. म्हणूनच 2022 या नव्या वर्षांमध्ये अशा प्रकारे होत असलेल्या तंत्रज्ञानामधल्या बदलांचा एक धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

कोरोनाच्या महासंकटामुळे घडलेला एक अत्यंत महत्त्वाचा बदल आपण अनुभवतोच आहोत. लोक आपापल्या घरी बसून काम करू शकतात आणि मुलं-मुली घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात याचा साक्षात्कार सगळ्यांना झालेला आहे. अर्थात घरी बसून कार्यालयीन काम बऱ्याच प्रमाणात यशस्वीपणे होऊ शकत असले तरी घरबसल्या शिक्षण घेण्याचा प्रकार मात्र फक्त ठरावीक वर्गातल्या कुटुंबांमधल्या मुलामुलींच्या बाबतीतच फलदायी ठरलेला आहे हे वास्तव आहे. तरीसुद्धा हे सगळं यशस्वीपणेच होऊ शकतं अशी टिमकी वाजवून त्याचा एका अर्थानं गैरवापर करण्यासाठी ‘एज्युटेक’ कंपन्या पुढे सरसावत राहतील. मुलामुलींनी शाळांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये शिकूच नये; आम्ही त्यांना शहाणे करून सोडू अशा प्रकारचा प्रचार अशा कंपन्यांकडून आता आणखी मोठय़ा प्रमाणावर सुरू होईल. आपल्या देशामधल्या बहुसंख्य कुटुंबांना दोन वेळा पोट भरण्याची भ्रांत असताना शिक्षणातल्या ‘आहे रे-नाही रे’ या वर्गामधली दरी यामुळे आणखी मोठी होईल अशी भीती व्यक्त केल्यावाचून राहवत नाही.

फेसबुक आणि इतर कंपन्या ‘मेटा’ तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करतील. यात खास करून बसल्या जागी करमणूक करून घेण्यासंबंधीच्या संकल्पना आणखी भन्नाट होत जातील. सध्या ‘ओटीटी’चा बोलबाला आहेच. याच्या जोडीला आता करमणूक करून घेण्याची संकल्पना आणखी वेगानं पुढे जाईल. म्हणजेच फक्त डोळे आणि कान यांच्याद्वारे संवेदना टिपण्याऐवजी आपली सगळीच गात्रं आता आभासी जग हेच खरं जग आहे असं मानायला लागण्याइतकी प्रगती हळूहळू व्हायला लागेल. उदाहरणार्थ समोरच्या पडद्यावर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याचं दृश्य असेल तर आपल्या पायांना मऊ वाळू आणि पाणी यांचा स्पर्श झाल्यासारखं वाटेल. तसंच आपल्याला समुद्राचा विशिष्ट प्रकारचा खारा वास येतो तसा वास आपल्या नाकाला जाणवेल. असं बरंच काही. म्हणजेच हे सगळ त्रिमितीय दृश्यांच्याही पलीकडचं असेल. वास्तव आणि आभास यांच्यामधले फरक आणखी धूसर होतील.

‘आभासी’ शब्द आल्यावर ‘आभासी चलन’ विसरून कसं चालेल? बिटकॉइन आणि इतर आभासी चलनं यांच्याविषयीची चर्चा पुढे जाईल. तसंच सरकारी आभासी चलनं बाजारात आणण्याला मुहूर्त लागेल. मोठय़ा देशांमध्ये बहुधा चीनचा यात पहिला क्रमांक लागेल. मुक्त, अनिर्बंध आभासी चलनं आणि सरकारी आभासी चलनं यांच्यामधला संघर्ष कदाचित आणखी तीव्र होईल किंवा सरकारांच्या वतीनं या मुक्ततेवर जोरदार निर्बंध घातले जाऊन तो काहीसा क्षीणही होईल. पण यामुळे मुक्त बाजारपेठेचे पुरस्कर्ते हार मानणार नाहीत. उलट इंटरनेट आणि तत्सम माध्यमांवर सरकारी गळचेपी आणखी कडक होत असल्याच्या भावनेपोटी यातून त्यांच्या आणखी चळवळी निर्माण होतील. निर्बंधमुक्त इंटरनेट, चलनं, व्यवहार यांच्यासाठीचा संघर्ष आणखी जोर पकडेल.

ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानामुळे ‘मध्यस्थ’ किंवा ‘दलाल’ म्हणून कार्यरत असलेल्यांच्या वरचष्म्याला बसत असलेला धक्का आणखी वाढेल. यामागचं कारण म्हणजे व्यवहार करणाऱया दोन व्यक्तींमध्ये किंवा संस्थांमध्ये इतर कुणी विनाकारण लुडबूड करण्याची गरज बऱयाच अंशी कमी होऊ शकते. अर्थातच हे सावकाशीनं घडत राहील. तसंच अनेक जणांचे हितसंबंध यामुळे धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे व्यावहारिकदृष्टय़ा हे कितपत शक्य होईल याविषयी साशंकता व्यक्त करावीशी वाटते. उदाहरणार्थ सरकारच्या वतीनं जारी केल्या जाणाऱया निविदा ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे अत्यंत पारदर्शी होऊ शकतात. पण मुळात असा पारदर्शीपणा सत्ताधाऱयांना परवडण्यासारखा असेल का, हा कळीचा मुद्दा असल्यामुळे आपल्याला सोयीच्या नसलेल्या तंत्रज्ञानाला गुंडाळून ठेवण्याकडेच त्यांचा कल असेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग यांच्या तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आणखी पुढे जातील. एकीकडे रोजगारांचं स्वरूप आणखी बदलत जाईल. अकुशल आणि हातावर पोट असलेल्या लोकांना दुर्दैवानं याचा अधिकाधिक फटका बसत जाईल. भविष्यामध्ये काय घडेल याची चाहूल घेऊन त्यानुसार आपला मार्ग आखू शकण्याची आर्थिक आणि सामाजिक कुवत असलेले लोक मात्र चतुरपणे याचा फायदा उठवून आपलं स्थान भरभक्कम करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. एकूणच ज्यांना या तंत्रज्ञानांच्या दुष्परिणामांचा फटका बसणार आहे त्यांना याची कल्पनाच नसेल आणि ती आली तरी आपण नेमकं काय केलं पाहिजे याची त्यांना अजिबात जाणीव असणार नाही.

लोकांची माहिती मोठय़ा प्रमाणावर गोळा करून त्याचा फायदा आपल्या मतलबासाठी करणं, त्यांच्यावर पाळत ठेवणं, त्यांच्यावर ठरावीक प्रकारच्या प्रचारकी मजकुराचा मारा करणं या एकाधिकारशाहीला पूरक असलेल्या गोष्टींचा वापर करण्याचं कौशल्य काही जणांनी आत्मसात केलेलंच आहे. यामधल्या तंत्रज्ञानाचा आणखी नव्या प्रकारे वापर करून अनेक ठिकाणी एकाधिकारशाही वाढत चालल्याचंही आपल्या निदर्शनाला येईल. एकूणच तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे माणसं खूप पुढे जात असल्याचं आशादायी दृश्य एकीकडे दिसत असलं तरी या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून माणसांना इतर माणसांपासून दूर केलं जात असल्याचं दुर्दैवी दृश्यही हताशपणे बघावं लागेल.

– [email protected]
(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत.)