
>> रंगनाथ कोकणे
केवळ जल, वायू आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञच नव्हे, तर आता संयुक्त राष्ट्रसंघानेही जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या दृष्टीने जगाला वारंवार सावध करण्यास सुरुवात केली आहे. वेगाने होत असलेली वृक्षकत्तल हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. वृक्षतोडीची ही वेगवान झालेली प्रक्रिया थांबली नाही तर भविष्यातील पृथ्वीच्या स्वरूपाची कल्पनासुद्धा करवणार नाही इतकी भीषण अवस्था असेल.
जगाचे बिघडत चाललेले पर्यावरण आणि जागतिक तापमानवाढ या समस्यांपासून जगाची मुक्तता करण्याकामी माध्यमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतेच केले आहे. परंतु जागतिक तापमानवाढ रोखण्याकामी आपापली भूमिका प्रामाणिकपणे बजावणे हे केवळ माध्यमेच नव्हे, तर या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे. याबाबतीत जल, वायू परिवर्तन क्षेत्रातील तज्ञांचे एकमताने असे सांगणे आहे की, पृथ्वीवर जास्तीत जास्त झाडे लावली जाणे आणि ज्या कृतींमुळे झाडांना धोका निर्माण होईल अशा कृतींपासून दूर राहणे हेच जागतिक तापमानवाढ रोखण्याचे एकमेव साधन आहे. पृथ्वीवरील आपण सर्व रहिवासी जेव्हा झाडांचे महत्त्व जास्तीत जास्त जाणून घेऊ तेव्हाच जगात अधिकाधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता आहे.
जेव्हा या जगात एकही झाड शिल्लक नसेल तेव्हा ही पृथ्वी कशी दिसेल, असा विचार कुणी करून पाहिला आहे का? केला नसेल तर करून पाहायला हवा. प्रत्येकाने आपले डोळे बंद करून अशी कल्पना करून पाहावी, की नजरेच्या टप्प्यात सामावेल, अशा सर्व टापूमध्ये एकही झाड शिल्लक नाही आणि सर्वत्र उजाड, मोकळे माळरान आहे. मग अशी कल्पना करा, की जेव्हा जगात झाडच शिल्लक राहणार नाही तेव्हा आपल्याला वाचायला पुस्तकही मिळणार नाही. पुस्तक तर सोडाच; एक कागदसुद्धा कुठे मिळणार नाही. लाकडाचे फर्निचर कुठे दिसणार नाही, सुंदर-सुंदर फुले दिसणार नाहीत, फळांचे तर दर्शनही होणार नाही. सर्वांत मोठा प्रश्न आपल्याला असा पडला पाहिजे, की अशा स्थितीत आपल्यासाठी ऑक्सिजन कोण तयार करणार? कार्बन चक्र कसे पूर्ण होणार? अशा स्थितीत दोनच पर्याय मानवापुढे राहतात. एक म्हणजे, पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर राहायला जाणे किंवा पृथ्वीवरची बेसुमार वृक्षतोड तातडीने बंद करणे.
जंगलतोडीमुळे होत असलेल्या नुकसानीपासून पुढच्या काही पिढ्या कदाचित आपला बचाव करूही शकतील; परंतु ही बाब कायम शक्य होणारी नाही. आपल्यामुळे ज्यांचे आयुष्य अत्यंत खडतर बनले अशा पिढीचा उदय लवकरच होईल. हा दिवस फारसा दूर राहिलेला नाही. 2051 पर्यंत पृथ्वीवरील सुमारे 60 टक्के झाडे तोडली गेलेली असतील. विचार करा, त्यानंतरच्या पिढ्यांना श्वास घेण्यास किती अडथळे येतील! झाडांविना हवा श्वास घेण्यायोग्य राहणार नाही. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला कायम मास्क वापरावा लागेल. जे मास्क हवेत असणारा थोडासा ऑक्सिजनही गाळून आपल्याला पुरवू शकतील, असे मास्क तयार करण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर असेल.
जर झाडेच नसतील तर कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेणार कोण? हा घातक वायू आपल्यासमोर प्रचंड मोठे संकट निर्माण करेल. कारण प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून आपले अन्न आणि ऊर्जा तयार करण्यासाठी झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वायू शोषून घेतात. झाडेच नसतील तर या वायूचे काय करायचे, हा प्रश्न उभा राहील. झाडे नसतील तेव्हा कार्बन डाय ऑक्साइड ही केवळ मानवाची नव्हे तर सर्व जीवजंतूंसाठी एक मोठी समस्या ठरेल हे निश्चित आहे. जर या पृथ्वीवर झाडे शिल्लक राहिलीच नाहीत तर मातीत धोकादायक रसायने आणि प्रदूषकांचे मिश्रण तयार होईल. ही रसायने आणि प्रदूषके सामान्यतः झाडांकडून शोषली जातात किंवा गाळली जातात. त्याचबरोबर मातीची धूप थांबविणेही झाडांमुळेच शक्य होते. झाडे नसतील तर माती एके ठिकाणी टिकून राहणार नाही. परिणामी, धुळीची वादळे सातत्याने उद्भवतील. अशा स्थितीत शेती करणे अशक्य होऊन जाईल. लोकांना उपासमारीमुळे जीव गमवावा लागेल. सांगण्याचे तात्पर्य असे की, झाडांशिवाय पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकविणे आपल्याला शक्य नाही हे सर्वांना ठाऊक आहे. तरीसुद्धा झाडे वाचविण्यासाठी आपण प्रयत्न केले नाहीत तर आपण सर्वाधिक बुद्धिहीन आणि विवेकशून्य ठरू.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)




























































