महिलेचा पाठलाग करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. गोविंद राजकुमार निर्मल असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या पती आणि मुलासोबत जोगेश्वरी परिसरात राहतात. 2011 मध्ये महिलेने ऑनलाइन पोर्टलवरून खाण्याच्या वस्तू मागवल्या होत्या. तेव्हा डिलिव्हरी बॉयचे काम करणारा गोविंद त्या वस्तू घेऊन महिलेच्या घरी आला होता. वस्तू डिलिव्हरीदरम्यान त्याला महिलेचा नंबर मिळाला. नंबर मिळाल्यानंतर तो महिलेला सतत फोन करायचा. सुरुवातीला महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरदेखील गोविंद हा महिलेला फोन करतच असायचा. अखेर महिलेने याची माहिती तिच्या पतीला दिली. महिलेच्या पतीनेदेखील गोविंदची समजूत काढली. तरी तो सुधारत नव्हता.

2014 मध्ये गोविंद पुन्हा दुसऱ्या ठिकाणी कामाला राहिला. अॅक्वागार्डचे सॅम्पल घेऊन गोविंद महिलेच्या घरी आला तेव्हा महिलेने गोविंदला घरी येण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर गोविंद इस्त्रीवाला बनून महिला राहत असलेल्या इमारतीत येत असायचा. गोविंदच्या त्रासाला पंटाळून महिलेने जोगेश्वरी येथील घरदेखील बदलले होते. गेल्या आठवड्या महिला या ओशिवरा मार्केट येथे खरेदीसाठी गेल्या होत्या तेव्हा गोविंदने महिलेचा पाठलाग केला. अखेर महिलेने याबाबत तिच्या पतीला माहिती सांगितली. महिलेने ओशिवरा पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपास सुरू होताच पोलिसांनी गोविंदला जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.