प्रा. एन. डी. पाटील यांना अखेरचा लाल सलाम! कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अमर रहे… अमर रहे… एन. डी. पाटील अमर रहे’ आणि ‘लाल सलाम’च्या जयघोषात पुरोगामी आणि सीमालढा चळवळीचे लढवय्ये व शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना आज साश्रुपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. कसबाबावडा येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्ययात्रा न काढता, कोणतेही कर्मकांड न करता शासकीय इतमामात केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत शेकापचे ज्येष्ठ नेते आणि सीमाभाग चळवळीचे लढवय्ये प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांचे सोमवारी दुपारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले.

रयत शिक्षण संस्थेच्या सदर बाजार येथील छत्रपती शाहू विद्यालयाच्या प्रांगणात प्रा. एन. डी. पाटील यांचे पार्थिव आज सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई (माई) पाटील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार प्रा. एन. डी. पाटील यांचे सुपुत्र सुहास, प्रशांत, सुन संगिता, नात रिया, माईंच्या बहीण मीना जगधने, भाची विजया पाटील असा परिवार होता. सकाळी 9 ते दुपारी 1पर्यंत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून अंत्यदर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर अंत्ययात्रा न काढता पार्थिव थेट कसबाबावडा येथील पंचगंगा स्मशानभूमीत आणण्यात आले. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, गृहराज्यमंत्री व जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार वैभव नायकवडी,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रतापराव पवार, पार्थ पवार, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, सदाभाऊ खोत, इतिहास संशोधक जयसिंग पवार, उल्का महाजन, महाराष्ट्र एकीकरण समिती, निपाणीचे जयराम मिरजकर, मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर, मेघा पानसरे, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, गोपुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, भारत पाटणकर, रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱयांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले.