कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड दवाखान्यांतही मिळणार, डीसीजीआयची सशर्त परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आता रुग्णालयांमध्ये जाऊन रांगा लावण्याची गरज भासणार नाही. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लसी खुल्या बाजारात विकण्यास केंद्रीय औषध नियंत्रकांनी (डीसीजीआय) सशर्त परवानगी दिली आहे. मात्र या लसी मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार नाहीत तर रुग्णालये आणि खासगी क्लिनिक्समध्येच खरेदी करून तिथेच घेता येणार आहेत.

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोनच लसींना देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी आहे. काही अटी घालून या लसी प्रौढांसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्यास परवानगी द्यावी अशी शिफारस डीसीजीआयच्या ‘कोविड 19’ तज्ञ समितीने केली होती. त्यानुसार आता त्या लसी नागरिकांना रुग्णालये आणि खासगी क्लिनिक्समध्ये विकत घेता येणार आहेत. विकल्या जाणाऱया लसींची संपूर्ण आकडेवारी रुग्णालये आणि क्लिनिक्सना दर सहा महिन्यांनी डीसीजीआयकडे पाठवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे ती माहिती को-विन अॅपवरही द्यावी लागणार आहे. तसे बंधन घालण्यात आले आहे.

आपत्कालीन वापरात लसींची माहिती दर पंधरा दिवसांनी डीसीजीआयला द्यावी लागते. देण्यात आलेल्या लसी आणि लस घेतल्यानंतर जाणवलेले दुष्परिणाम आदी माहितीचा त्यात समावेश असतो. आता खुल्या बाजारात विक्री सुरू झाल्यानंतर माहिती देण्यास सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

कोव्हॅक्सिन बनवणारी भारत बायोटेक आणि कोविशील्डची निर्मिती करणाऱया सीरम इन्स्टिटय़ूटने आपल्या लसी खुल्या बाजारात विकण्यास परवानगी मिळावी असा अर्ज डीसीजीआयकडे केला होता. आपल्या लसींचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असून त्या सुरक्षित असल्याचेही सिद्ध झाले आहे असे त्यांनी अर्जात नमूद केले होते.

  • लसींची किंमत अजून ठरली नसली तरी एक डोस 275 रुपये असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.