संगमनेर, अकोल्यातील पाचजण हद्दपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेले संगमनेर, अकोले तालुक्यांतील पाच सराईत गुन्हेगार नगर जिह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचा आदेश संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिला आहे. या गुन्हेगारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये संगमनेरमधून चारजण, तर अकोले तालुक्यातील राजूर येथील एकजण असे पाच सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

राजेंद्र अंतू कोल्हे (रा. धांदरफळ) याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत त्याला हद्दपार करण्यात आले आहे. सुनील वाळिबा घुगे (रा. निमोण) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. दीपक सोमनाथ पानसरे (रा. कोल्हेवाडी रोड) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तन्वीर कदीर शेख (रा. नाटकी) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच अकोले तालुक्यातील राजूर येथील सचिन बाळू इदे याच्याविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यामध्ये चार गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

या पाचजणांना संगमनेरचे उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी आज तडीपार केल्याचे जाहीर केले आहे. या सर्वांना नगर जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे