
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोक लॉकडाऊनचे पालन करत होते; परंतु काँग्रेसने मुंबईतील रेल्वे स्टेशनवर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना तिकिटे काढून दिली. यामुळे देशात कोरोना संसर्ग वेगाने पसरला, असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या ‘डीएनए’ मध्ये घुसली आहे. काँग्रेस ‘तुकडे तुकडे गँग’ची लीडर बनली आहे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना कोरोना महामारीची जबाबदारी झटकल्यामुळे देशभरात आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
पेट्रोल-डिझेलसह सर्वच वस्तुंची दरवाढ झाल्यामुळे देशभरात महागाईचा भडका उडाल्याने जनता त्रस्त आहे. मात्र, आज पंतप्रधानांनी कोरोना संकटात महागाई नियंत्रणात ठेवल्याचा दावा केला. 2014 ते 2020 दरम्यान, महागाईचा दर 5 टक्क्यांच्या खाली होता, असे ते म्हणाले.
काँग्रेसने मुंबईच्या रेल्वेस्टेशनवर स्थलांतरीत मजुरांना तिकिटे काढून दिली. मजुरांना त्यांच्या गावी पाठवून दिले. गावी जाण्यासाठी मजुरांना उसकवले. त्यामुळे देशात कोरोना वेगाने पसरला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये कोरोना अधिक पसरला गेला. त्याचवेळी दिल्ली सरकारनेही स्थलांतरीत मजुरांना राजधानी सोडण्यास सांगितले. बस उपलब्ध करून दिल्या.
…तर मग पुढे नेहरूच, नेहरू आहेत
महागाईच्या मुद्यावर बोलताना मोदींनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटले होते याचा संदर्भ दिला. पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसने महागाईचा मुद्दा उपस्थित केलाच आहे तर पुढे नेहरूच, नेहरू आहेत. पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात कोरियातील युद्धाचा, अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या परिणामामुळे महागाई होते’, असे म्हटले होते.
- ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या. पण काँग्रेसने कधीच गरिबी दूर केली नाही. यामुळे देशातील गरिबांनीच काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकले.
- सामान्यांना गॅस कनेक्शन, घरे, शौचालये दिली. बँक खाते उघडली. पण विरोधकांची मानसिकता अजूनही 2014चीच आहे.
- छोटय़ा शेतकऱयांना मदत करण्याचा, बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण छोटय़ा शेतकऱयांच्या वेदना ज्यांना माहित नाही त्यांना शेतकऱयांच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही.
- तुम्हाला आत्मनिर्भर भारत नको का? महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करायचे नाही का?
- ‘मेक इन इंडिया’वर काहींना आक्षेप आहे. कारण भ्रष्टाचार, कमिशन आणि तिजोरी भरण्याचा मार्ग बंद यामुळे विरोध होतो आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत उत्तर दिले. तब्बल 100 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर आरोप व टीका केली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधानांनी संसदेत आज प्रचाराचे भाषण केले, अशी टीका देशभरातून होत आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या खासदारांनी आक्षेप घेतला आणि जोरदार घोषणाबाजीही केली.
पंतप्रधान काय म्हणाले?
- इंग्रज निघून गेले, पण ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला काँग्रेसने चरित्र बनविले आहे. विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या ‘डीएनए’ मध्ये घुसली आहे. काँग्रेस ‘तुकडे तुकडे गँग’ची लीडर बनली आहे.
- काँग्रेसचा अहंकार कमी झालेला नाही. अनेक निवडणुकांमध्ये पराभवानंतरही यात बदल झालेला नाही. काँग्रेसने पुढील 100 वर्षे सत्तेत न येण्याची मानसिकता तयार केलेली दिसते. तुम्ही ही मानसिकता तयार केली आहे तर, मीही त्यादृष्टीने तयारी केली आहे.
- मला विरोध करा, पण फिट इंडिया मोहिमेला आणि इतर योजनांना काँग्रेस का विरोध करतेय?
दुसऱया लाटेत गंगेमध्ये किती मृतदेह वाहून आले माहीत नाही! मोदी सरकारचे कानावर हात
कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना गंगा नदीच्या प्रवाहात किती मृतदेह वाहून आले याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत मोदी सरकारने चक्क कानावर हात ठेवले आहेत. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये काही जिल्हय़ात अशा घटना समोर आल्या होत्या, पण मृतदेहांची नेमकी आकडेवारी आमच्याकडे नाही, असे केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी राज्यसभेत सांगितले. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ ब्रायन यांनी प्रश्न विचारला होता.




























































