
>> अमीन सयानी
बहनो आणि भाईयो, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं. मी हृदयावर हात ठेवत खूप दुःखी होऊन तुमच्याशी बोलतोय. कारण आज आपल्यात सुरांची सम्राज्ञी राहिलेली नाही. शब्द जड झालेत. आठवणींचा पट डोळ्यांसमोर तरळतोय. लता मंगेशकर यांचा काय आवाज… काय गाणी होती. जणू काही परमेश्वराने त्यांचा गळा मधात घोळला होता. लताजींच्या प्रत्येक गीताने माझ्या हिट परेड ‘बिनाका गीतमाला’ मध्ये सुरीली धूम उडवली होती.
सगळे लताजींना ‘दीदी’ म्हणायचे. मी मात्र त्यांना कधी ‘दीदी’ म्हटलं नाही. कारण त्या माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठय़ा असल्या तरी माझ्यापेक्षा खूप लहान वाटायच्या. आमच्यात खूप हसतखेळत गप्पा व्हायच्या. घरी येणे-जाणे असायचे. मी त्यांची ऑल इंडिया रेडिओसाठी पहिली मुलाखत 1971 मध्ये घेतली होती. त्यामध्ये त्या मास्टर दीनानाथ मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि एकूणच संगीताबद्दल बोलल्या होत्या. नंतर रेडिओ सिलोनच्या ‘फिल्मी मुकदमा’ कार्यक्रमासाठी त्यांची मुलाखत केली. 1980 मध्ये लता स्पेशलच्या पाच कॅसेट केल्या होत्या. त्या मुलाखतीच्या नव्हत्या, प्रेझेंटेशनच्या होत्या. 2004 साली मी लताजींवर पाच कार्यक्रम केले. संगीत सितारों की महफील अंतर्गत. त्यामध्ये दोन विस्तृत मुलाखती होत्या. खरं तर रेडिओ सिलोनसाठी हा कार्यक्रम केला होता, मात्र नंतर अन्य एफएम चॅनेलवरही तो प्रसारित झाला. अगदी न्यूझीलंड, यूएईमध्ये हा कार्यक्रम गेला. 80 च्या दशकात मी लता मंगेशकर यांच्या शोचे सूत्रसंचालन केले. जेव्हा त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स तयार केल्या जायच्या तेव्हा त्यात गाणी कोणती घ्यावी यावर चर्चा व्हायच्या. माझी पत्नीही चर्चेत असायची. अर्थात शेवटी अंतिम निर्णय लताजींचा असायचा.
मला आठवतंय एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, रेडिओ इंटरह्यूमध्ये सगळ्यात चांगली मुलाखत अमीन सयानी यांची होती. माझ्यासाठी ही मोठी शाब्बासकी होती. लताजींना माझी शैली आवडायची. त्यामुळेच त्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मला करायला मिळाले होते. मला तर स्वरकोकिळेची सगळी गाणी आवडतात. त्यातही जुन्या काळातील गाणी जास्त आवडतात. ‘गाईड’ मधील पिया तोसे नैना लागे रे, ‘मुझे जिने दे’चे तेरे बचपन को जवानी की दुआ देती हूं, ‘चोरी चोरी’ मधील रसिक बलमा, ‘सती सावित्री’चे जीवन डोर तुम्ही संग बंधी, ‘दुल्हन एक रात की’ मधील सपनों मैं अगर मेरे तुम आओ… ही माझ्यासाठी सदाबहार गाणी आहेत. या गाण्यांचा ठेवा आयुष्यभरासाठी आहे.
अलीकडच्या काळात आमची भेट झाली नव्हती. पण फोनवरून अधेमधे बोलणं व्हायचं, ख्यालीखुशाली विचारली जायची. वाढदिवसाला, दिवाळीला त्यांचा आवर्जून फोन यायचा. आता त्यांचा आवाज ऐकू येणार नाही. पण गीतांच्या रूपाने त्या आपल्यासोबत राहतील. आज प्रत्येक चाहत्याचे हृदय हेच गाणं म्हणतंय, तुम क्या जानों तुम्हारी याद में हम कितना रोये…
(लेखक ज्येष्ठ रेडिओ निवेदक आहेत.)


























































