
हॅलो.. पोलिस नियंत्रण कक्ष…अहो माझ्या मित्राला भुताने झपाटले आहे. तो वेड्यासारखे करीत असून हातात कात्री घेउन सतत पंख्याकडे बघत आहे. लवकर पोलिस मदत पाठवा, असा कॉल मिळताच पोलीस नियंत्रण कक्षातील अमलदाराने तत्काळ दखल घेतली. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मार्शलांनी कॉलरची माहिती घेउन विचारणा केली. तेव्हा मित्राला स्वप्न पडले होते. तो हातात कात्री घेउन पंख्याकडे बघत होता. आता तो व्यवस्थित असून घाबरलेल्या अवस्थेत आम्ही फोन केल्याचे ऐकताच मार्शलांनी कपाळावर हात मारून घेतला.
पुणे पोलिस नियंत्रण कक्षात मदतीऐवजी वेगवेगळ्या फोनकॉल्समुळे महिला कर्मचाऱ्यांची काहीवेळेस चांगलीच करमणूक होते 8 फ्रेब्रुवारीला दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाघोलीतील एकाने नियंत्रण कक्षात फोन केला. अहो मॅडम माझ्या मित्राला भुतानं झपाटले आहे, तो हातात कात्री घेउन सारखा पंख्याकडं बघत आहे, लवकर मदत पाठवा अशी विनवणी केली. त्यामुळे महिला अमलदाराने तत्काळ लोणीकंद पोलीस ठाण्यातील बीट मार्शलला कॉलची माहिती दिली. त्यानुसार मार्शल प्रीतम वाघ आणि गणेश डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघोलीनजीक केसनंद रस्ता परिसरातील गुलाबनगरमध्ये कॉलरचे लोकेशन ट्रेस झाल्यानंतर त्यांनी संबंधिताला फोन करून घटनास्थळ गाठले.
पोलीस मदतीसाठी लक्ष्मीनारायण खुर्रा तरूणाने नियंत्रण कक्षात फोन केल्याचे मार्शलांना सांगितले. त्याचा मित्र नरेंद्रला स्वप्न पडल्यामुळे तो हातात कात्री घेऊन सारखा पंख्याकडे पाहत होता. त्याला भुतानं झपाटल्याची शंका आल्यामुळे मला भीती वाटली, त्यामुळे फोन करून पोलीस मदत मागितल्याचे त्याने सांगितले. तरूणाचे उत्तर ऐकताच बीट मार्शलांनी कपाळावर हात मारून घेत, नियंत्रत कक्षात माहिती देउन कॉल पूर्ण केला. संबंधित दोघेही तरूण खासगी कंपनीत कामाला असून एकाच खोलीत राहायला आहेत. स्वप्न पडल्यामुळे आम्ही पोलिसांना मदत मागितली. लोणीकंद पोलिस ठाण्यातील बीट मार्शल वेळेत येउन विचारपूस केल्यामुळे तरूणांनी पोलिसांचे आभार मानले.
लॉकडाउनमध्ये येत होते प्रपोजचे कॉल
लॉकडाउन कालावधीत पुणे पोलिस नियंत्रण कक्षातील महिला अमलदारांना काहीजणांकडून अनपेक्षित थेट लग्नासाठी प्रपोजचे फोन केले जात होते. सर आपणाला काय मदत हवी आहे का, नाहीतर आपला फोन डिसकनेंक्ट केला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, फोनकत्र्याकडून अहो, मॅडम तीन महिन्यांपूर्वी माझे लग्न जमणार होते. पण आता, पोरगी कोण देत नाय, काय करावं सुचत नाही, तुम्ही लग्न करता का माझ्याशी, अशा प्रश्नांमुळे महिला कर्मचारी अचंबित होत होत्या.
तरूणाने मित्राला भुतानं झपाटल्याचे सांगून लवकर पोलिस मदत पाठवा, असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षात केला होता. त्यानुसार आम्ही कॉलरचे लोकेशन ट्रेस करून घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी स्वप्न पडल्यामुळे मित्र घाबरल्याचे कॉलरने सांगितले. त्यांची माहिती नियंत्रण कक्षाला कळवून कॉल पूर्ण केला.
प्रीतम वाघ, लोणीकंद पोलीस ठाणे, बीट मार्शल






















































