
’हिटमॅन’ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आज लखनौतील श्रीलंकन संघाविरुद्धची पहिली टी 20 जिंकून सलग या फॉरमॅटमध्ये सलग दहावी लढत जिंकत विजयाची विजयादशमी साजरी केली. या पराक्रमामुळे हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानचा सलग 9 टी 20 लढती जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 12 टी 20 जिंकण्याचा विश्वविक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. वेस्ट इंडीजवर टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश मिळविलेल्या यजमान टीम इंडियाने दौऱयावर आलेल्या श्रीलंकन संघाचाही सलामीच्या टी-20 क्रिकेट सामन्यात 62 धावांनी धुव्वा उडविला. कर्णधार रोहित शर्मासह ईशान किशन व श्रेयस अय्यर या आघाडीच्या फळीची तुफानी फलंदाजी आणि त्यानंतर अचूक गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने सहज विजयी सलामी देत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 89 धावांची खेळी करणारा ईशान किशन सामनावीर ठरला. हिंदुस्थानकडून मिळालेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 6 बाद 137 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
z रोहित-ईशानची शतकी भागीदारी
त्याआधी, नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण देण्याचा निर्णय श्रीलंकेच्या अंगलट आला. कर्णधार रोहित शर्मा (44), ईशान किशन (89) व श्रेयस अय्यर (नाबाद 57) या आघाडीच्या फळीने तुफानी फलंदाजी करीत हिंदुस्थानला 2 बाद 199 धावांचा डोंगर उभारून दिला. या त्रिकुटाने श्रीलंकेच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. रोहित-ईशान जोडीने 11.5 षटकांत 111 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली. रोहितने 32 चेंडूंत 2 चौकारांसह एक षटकार लगावला. ईशानने 56 चेंडूंत 10 सणसणीत चौकारांसह 3 उत्तंgग षटकार ठोकले.
श्रेयसचे वादळी अर्धशतक
लाहिरू कुमाराने रोहितचा त्रिफळा उडविल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने 28 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह आपली नाबाद वादळी अर्धशतकी खेळी सजविली. दानुस शनाकाने 17 व्या षटकांत ईशानला लियागाकरवी झेलबाद केले. अखेरच्या क्षणी आलेला रवींद्र जाडेजा 3 धावांवर नाबाद राहिला.
z श्रीलंकेकडून मधल्या फळीतील चरित असलंकाने 47 चेंडूंत 5 चौकारांसह 53 धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. त्यानंतर तळाला चमिका करुणारत्ने (21) आणि दुशमंथा चमीरा (नाबाद 24) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजीचा थोडाफार प्रतिकार केला. हिंदुस्थानकडून भुवनेश्वर कुमार व व्यंकटेश अय्यर यांनी 2-2 फलंदाज बाद केले. युझवेंद्र चहल व रवींद्र जाडेजा यांना 1-1 बळी मिळाला. पदापर्णवीर दीपक हुडा0सह जसप्रीत बुमराह व हर्षल पडेल यांना एकही बळी मिळाला नाही.




























































