
>> मंगल गोगटे
आपला देश हा निसर्गदत्त सुंदर जागांचं वरदान लाभलेला देश आहे. सगळ्या दिशांना निसर्ग वेगळी विलोभनीय दृश्य दाखवत बोलावत असतो, खुणावत असतो. काही जागांना मात्र लवकर भेट देण्याची गरज आहे. कारण त्या पुढील 15 ते 20 वर्षांत नाहीशा होण्याची लक्षणं आहेत.
आसामचं माजुली बेट हे वैविध्यपूर्ण वन्य जीवन पाहण्यासाठीचं लोकप्रिय ठिकाण आहे. जगातील नदीतलं सगळ्यात मोठं बेट आहे हे. इथे खूप पक्षी आणि झाडंदेखील आहेत. ब्रम्हपुत्रा नदीला वारंवार येणारे पूर आणि जमिनीची धूप यामुळे या बेटाचा आकार दिवसेंदिवस लहान होतोय. पुढील 15 ते 20 वर्षांत हे बेट नाहीसं होईल, असा तज्ञांचा कयास आहे.
जम्मू आणि कश्मीरमधील वुलर तळं हे गोड्या पाण्याचं जगातलं सर्वात मोठं तळं आहे. पाण्यातील खेळांच्या स्पर्धा इथेच घेतल्या जातात, परंतु आता प्रदूषण आणि पाणपक्ष्यांच्या शिकारीमुळे इथलं पाणी कमी होत चाललंय. श्रीलंकेतील मन्नर आणि हिंदुस्थानमधील धनुषकोडी यांना जोडणारा रामायणकालीन सेतू तर सगळ्यांनाच माहीत आहे. पुराणातील गोष्टीप्रमाणे हा सेतू रामाने वानरांच्या सैन्याच्या मदतीने बांधला, परंतु आता इथे ‘सेतुसमुद्रम शिपिंग कॅनॉल प्रोजेक्ट’ सुरू होत असल्याने या सेतूचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.
असं म्हणतात की, सुंदर सूर्यास्त पाहायचा असेल तर जेसलमेर हे उत्तम ठिकाण आहे. तिथला किल्ला हे जगातील सर्वात मोठय़ा व सुंदर तटबंदीचा नमुना आहे. उत्तम अभिजात कला आणि स्थापत्यशास्त्राचं ते एक अस्सल उदाहरण आहे. या किल्ल्यात अजूनही बरीच लोकं राहतात. वाढणारी लोकसंख्या आणि आधुनिक प्लंबिंगमुळे 12व्या शतकातला हा किल्ला चांगल्या अवस्थेत नसून त्याची बांधणी वेगाने खिळखिळी होत आहे.
पश्चिम बंगालातील सुंदरबन हे जगातील खारफुटीचं सगळ्यात मोठं जंगल आहे. या जागेला मिळालेलं हे नाव ‘सुंदरी’ या झाडांवरून पडलं आहे. कारण पूर्वी खूप प्रमाणात ही झाडं तिथे होती. नदीच्या मुखाजवळचा हा त्रिभुज प्रदेश साधारण जमिनीच्या बराच खालच्या पातळीला असल्याने तो पाण्याखाली जाण्याची शक्यता मोठी आहे. याशिवाय जागतिक तापमानवाढीच्या परिणामांमुळे हे बन लवकरच इतिहासात जमा होईल असं दिसतंय.
पुरातत्वशास्त्रज्ञांना स्वप्नवत वाटावी अशी एक जागा हरयाणातील हिस्सार जिल्ह्यामध्ये आहे-राखीगढी. 1963मधील उत्खननानुसार हे शहर सिंधू संस्कृतीतील सगळ्यात मोठे शहर होते. ते हडप्पा अथवा मोहेंजोदारो येथे सापडलेल्या शहरांपेक्षाही मोठं आहे. सीबीआयची चौकशी होऊन त्यात पैशाची अफरातफर झाल्याचं उघडकीस आल्याने उत्खनन थांबवलं गेलं. त्यानंतरही याचं व्यवस्थापन चांगलं नसल्याने त्या परिसरात राहणारे लोक तिथल्या पुरातन वस्तू व मूर्ती चोरून त्या विकतात. असं चालूच राहिलं तर भविष्यात राखीगढीचं महत्त्व कमी होईल. मेघालयाच्या दक्षिणेकडे जे बालपक्रम राष्ट्रीय उद्यान आहे जिथले स्थानिक रहिवासी आहेत ‘गारो’ टोळ्यांचे लोक. आख्यायिकांप्रमाणे ही अशी जागा आहे जिथून आपल्यातून निघून गेलेले आत्मे चिरविश्रांतीसाठी जातात. हिरवीगार वनराई आणि वन्यजीवन यामुळे हा भाग निसर्ग आणि फोटो या दोन्हीसाठी विशेष आहे. परंतु कोळशाच्या खाणी आणि पाण्यासाठीची धरणं यामुळे जंगलाची जागा दररोज कमी होताना दिसते. यामुळे तिथे राहणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आहे.
प्रवाळाची बेटे फक्त पारदर्शक व उथळ पाण्यात वाढतात. निसर्गाचा हा चमत्कार आपल्याला लक्षद्वीप येथे पाहायला मिळतो. या द्वीपांच्या आजूबाजूने आपल्याला ‘कोरल रीफ’ वा प्रवाळाच्या बेटांची गर्दी दिसते. अत्यंत मनमोहक व चमचमणारे असं हे विविध रंगी कोरल आपल्याला मंत्रमुग्ध करतात आणि त्याभोवती फिरणारे हरतऱ्हेचे लहानमोठे रंगीबेरंगी मासे आपल्याला चकित करतात, परंतु स्फोट मासेमारी आणि कोरल उपटून काढणे यामुळे कोरल धोक्यात आलं आहे. पाण्याच्या प्रदूषणाने व जागतिक तापमान वाढीमुळे पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा धोका आहेच. आताच जर याबद्दल काही केलं नाही तर कोरल रीफ इतिहासात जातील.





























































