वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा यंदाही महाराष्ट्रात; दादरमध्ये 30 मार्चपासून रंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

49वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्य पद कॅरम स्पर्धा येत्या 30 मार्च ते 3 एप्रिल 2022 या कालावधीत मुंबईत रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व) येथे करण्यात आले आहे. याआधी 47वी राष्ट्रीय स्पर्धा 2019ला कुडाळ तर 48वी राष्ट्रीय स्पर्धा जळगाव येथे खेळवण्यात आली होती. आता या स्पर्धेच्या आयोजानाने महाराष्ट्र कॅरम संघटना  राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाची हॅटट्रिक साधणार आहे.

   यंदाच्या मुंबईतील वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेला आयुर्विमा महामंडळाने पुरस्कृत तर इंडियन ऑईल, युनियन बँक, ओएनजीसी व हिंदुस्थान पेट्रोलियम सहपुरस्कृत करणार आहेत. या स्पर्धेत 25 राज्यांचे आणि 12 संस्थांचे एकूण 27 संघ सहभागी होणार आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि सांघिक गटातील विजेते पदासाठी स्पर्धेत जोरदार चुरस आहे. यजमान महाराष्ट्रातील 6 महिला व 5 पुरुष कॅरमपटूंसह प्रत्येक विभागातील अतिरिक्त 8 खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे.