
अनैतिक संबंधातून एका विवाहितेचा खून केल्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घडला आहे. या संदर्भात मृत महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या महिलेचा प्रियकर सोपान बापू भवार (रा. वडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी भवार याला अटक केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, या घटनेतील मृत महिलेचे गावातीलच भवार याच्याशी अनैतिक संबंध होते. 24 मार्च रोजी महिलेच्या पतीला गावातीलच एका व्यक्तीने फोन करून सांगितले की तुमच्या शेतातील ऊस पेटला आहे. ते शेतात गेले असता त्यांना पेटलेल्या उसात आपल्या पत्नीचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला.
त्याच वेळी गावातीलच एकाने आपल्याला या घटनेतील आरोपी भवार हा शेताजवळून दुचाकी वरून जाताना दिसला असल्याचे सांगितले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे पाठवल्यानंतर या महिलेचा गळा दाबून खून केल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
त्यानंतर मृत महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून भवार याच्या विरोधात खून केल्याचा व पुरावा नष्ट करण्याचा प्रकार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सहायक पो. निरी. रामेश्वर कायंदे हे करत आहेत.




























































