
‘प्रबोधन, गोरेगाव’ ही मुंबईतील एक नामांकित संस्था. कला-साहित्य-संस्कृती-शिक्षण-क्रीडा-आरोग्य या सर्वच क्षेत्रांत अविरत कार्यरत असणारी ही संस्था या गुढीपाडव्याला 51 व्य़ा वर्षात पदार्पण करणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी एका छोटय़ा उपक्रमाने सुरू झालेल्या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संस्थेचा आजवरचा प्रवास सुभाष देसाई यांच्याच शब्दात…
‘प्रबोधन गोरेगाव’ या आमच्या संस्थेची सुरुवात अगदी छोटय़ा उपक्रमांनी झाली होती. पन्नास वर्षांपूर्वी गिरगाव, दादर, विलेपार्ले पाठोपाठ गोरेगावात मराठी माणसांची वस्ती काढत होती आणि गोरेगाव प्रामुख्याने मराठी माणसांचं गाव झालं होतं, पण या मराठी माणसाच्या ज्या साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक गरजा होत्या, त्या पूर्ण करणारी कुठलीच संस्था इथे नव्हती. इथला मराठी समाज जोडला जाईल आणि एकत्र राहील यादृष्टीने गोरेगावात ठोस काम करण्याची गरज होती. म्हणून आम्ही अशी एक संस्था स्थापन करण्याचं ठरवलं ज्यायोगे मराठी माणसांना जोडून घेता येईल. अर्थातच संस्थेसमोर काही उद्दिष्टे असणं आवश्यक होतं. यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन भेटलो. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे, ‘इतर मंडळं जे करतात ते तुम्ही करू नका, तर इतर लोक जे काम करत नाहीत ते तुम्ही करा.’ बाळासाहेबांनी आम्हाला खूपच मौलिक असं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले होते, ‘समाजाच्या गरजा लक्षात घ्या. समाज- जीवनातील दुर्लक्षित राहिलेले कप्पे शोधून काढा आणि त्यावर काम करा.’ त्यांच्या या सल्ल्याने आम्हाला चालना मिळाली आणि आमची दिशा ठरली. काय दुर्लक्षित राहिलं आहे हे शोधताना कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणं, छोटय़ा-मोठय़ा कलांना व्यासपीठ मिळवून देणं, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळकून देणं या प्रमुख गोष्टींची गरज असल्याचं जाणकलं.
शैक्षणिक-सांस्कृतिक
एका रांगोळी स्पर्धेने आम्ही सुरुवात केली. त्यानंतर एसएससीच्या विद्यार्थांसाठी मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजित केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी एकांकिका आणि वक्तृत्व स्पर्धा सुरू केल्या. तिथे जम बसल्यावर मग आम्ही साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात काम सुरू केलं. मराठी रंगभूमीच्या उत्कर्षाचा तो काळ होता. अनेक मराठी नाटकं रंगभूमी गाजवत होती, पण त्यांचे प्रयोग दादर, गिरगाव या भागात व्हायचे. या नाटकांचे प्रयोग उपनगरातील रसिकांना पाहता यावेत म्हणून प्रबोधन संस्थेने अ. भि. गोरेगावकर शाळेच्या पटांगणात व्यावसायिक नाटकांचा नाटय़महोत्सव सुरू केला. त्यानंतर नामांकित वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली. महाराष्ट्राला लाभलेली थोरामोठय़ांची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही थोरामोठय़ांचे जीवन दर्शन घडवणारे उत्सव केले. त्यात समर्थ उत्सव, सावरकर उत्सव, पु. ल. उत्सव, बाळासाहेब ठाकरे उत्सव केले. अभिजात हिंदुस्थानी संगीताचा महोत्सव ‘मुंबई फेस्टिवल’ नावाने सुरू केला. त्या मंचावर पं. भीमसेन जोशींपासून ते झाकीर हुसेनपर्यंत अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले. एक वर्ष मुंबई उपनगर साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधीही प्रबोधन संस्थेला मिळाली होती. आता संस्थेचं नाव सर्वदूर पोहोचलं होतं.
प्रबोधन क्रीडा भवन
शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रकाराकडे दुर्लक्ष होतंय हे ओळखून आम्ही या क्षेत्राकडे वळलो. यामागेही बाळासाहेबांची प्रेरणा होतीच. खेळांच्या स्पर्धा त्या काळी उपनगरात होतंच नव्हत्या. फक्त चर्चगेटला क्रॉस मैदानावर काही मोजक्या शाळांच्या स्पर्धा व्हायच्या. उपनगरातील शालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धांपासून वंचित होते. म्हणून प्रबोधन संस्थेने 1977 साली आंतरशालेय क्रीडा महोत्सव सुरू केला. तेव्हापासून दरवर्षी क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो. सुमारे दोनशेहून अधिक शाळा आणि पाच हजार विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात भाग घेतात. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की, दुर्लक्षित राहिलेले कप्पे शोधून काढा, ते आम्ही केलं आणि उपनगरात जे होत नव्हतं ते संस्थेने सुरू केलं. अॅथलेटिक असोसिएशनचे तेव्हाचे अध्यक्ष क्रीडा महर्षी यशवंतराव भोळे यांच्या शिफारशीमुळे आणि तत्कालीन मनपा आयुक्त स. शं. तिनईकर यांच्या पाठिंब्यामुळे 1991 साली संस्थेला मैदान मिळालं आणि प्रबोधन क्रीडा भवन सुरू झालं. अनेक प्रकारचे खेळ या मैदानावर खेळले जाऊ लागले. खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं, त्यांचे संघ तयार होऊ लागले. आता तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आम्ही 20-20 सामने घेतो. क्रीडा जगतातील अनेक मोठय़ा संस्था क्रीडा भवनाशी संलग्न आहेत.
आरोग्यविषयक उपक्रम
साहित्य, संस्कृती, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रात काम करताना असं लक्षात आलं की, या भागात एकही रक्तपेढी नाहीये. रक्ताची गरज भासली तर बोरिवलीला भगवती रुग्णालयात किंवा पार्ल्याला कूपर रुग्णालयात जावं लागायचं. ही बाब आम्ही पालिकेच्या लक्षात आणून दिली. पालिकेने आम्हाला सिद्धार्थनगर मनपा रुग्णालयात जागा दिली आणि तिथे संस्थेने 2004 साली पालिकेच्या सहकार्याने गोरेगावातली पहिली चोवीस तास चालणारी रक्तपेढी सुरू केली – मीनाताई ठाकरे रक्तपेढी. गेल्या अठरा वर्षांत या रक्तपेढीला एक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यानंतर या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आणि पालिकेच्या जागेत अत्यंत माफक दरात चालकिण्यात येणारं डायलिसिस सेंटर सुरू केलं. तज्ञ डॉक्टरांची टीम या सेंटरची व्यवस्था पाहते आणि त्याचं व्यवस्थापन प्रबोधन संस्थेकडे आहे. या आरोग्यविषयक सुविधा उभारण्याचे प्रकल्प संस्थेने हाती घेतले आणि ते प्रकल्प यशस्वी झाले याचं आज समाधान वाटतं.
अनेक चांगले लोक यानिमित्ताने संस्थेशी जोडले गेले. सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत निस्वार्थ भावनेने काम केलंय, आजही करताहेत. इथे अंतर्गत राजकारण नाही की गटबाजी नाही. राजकारणात असलेला मी एकच माणूस या संस्थेत आहे. सगळ्यांना हे सामाजिक कामच आवडत आहे. संस्था स्थापन झाली त्यानंतरची पहिली पाचच वर्षे मी कार्यवाह पदावर होतो. पाच वर्षांनी मी ते पद सोडलं. आजही मी संस्थेच्या कोणत्याही पदावर नाही, पण मी संस्थेचं काम करतो. सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेत याच प्रकारे काम केलं आहे, करत आहोत. नव्या दमाची तरुण पिढीही आता बरोबर आहे.
संस्थेकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यादृष्टीने काही उपक्रम हाती घेत आहोत. तरुण वर्गाला व्यवसायासाठी कौशल्य आवश्यक असतं. मुला-मुलींमधील कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने रायगड जिह्यातील माणगाव इथे प्रबोधन संस्थेच्या वतीने कौशल्य निकेतन केंद्र सुरू करणार आहोत. मुंबईबाहेर हा पहिलाच उपक्रम असणार आहे. आणखी बऱयाच कल्पना डोक्यात आहेत. जसा त्यांना आकार येईल तशा त्याही योजना जाहीर करूच. संस्थेच्या प्रगतीचा आलेख कायम उंच जात राहावा यासाठी माझ्या शुभेच्छा!
शब्दांकन – मनीषा नित्सुरे






























































