केजरीवालांच्या घरावर भाजपचा हल्ला, ठार मारण्याचा कट … ‘आप’चा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटावरून भाजपने सुरू केलेले राजकारण आता हिंसक बनले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. बॅरिकेड्स तोडत, सीसीटीव्ही पह्डून घरावर हल्ला केला गेला. दरम्यान, भाजपच्या गुंडांना पोलिसांनी साथ दिली. भाजपकडून केजरीवाल यांच्या हत्तेचा कट रचला गेला आहे. त्यासाठी हल्ला केला गेला, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

सकाळी 11.30 च्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे 150 ते 200 कार्यकर्ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱया रस्त्यावर जमले आणि निदर्शने सुरू केली. पोलिसांचा फौजफाटा तैनात असतानाही दुपारी एकच्या सुमारास भाजपचे झेंडे घेतलेल्या या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडत थेट निवासस्थानच्या मुख्य गेटजवळ प्रवेश केला. बूम बॅरिकेड्सही तोडून टाकले. सीसीटीव्ही पॅमेरे पह्डले. घराच्या गेटवर लाल रंगाच्या पेंटचा डबा ओतण्यात आला. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस सुरक्षा असते. तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले.

केजरीवाल यांनी काय म्हटले होते?

गेल्या आठवडय़ात दिल्ली विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून भाजपने राजकारण करू नये असे सांगितले होते. भाजप म्हणते ‘कश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करा. त्यापेक्षा निर्माता-दिग्दर्शकाने हा चित्रपट ‘यूटय़ूब’वर टाकावा. देशभरातील जनता फ्री पाहील, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. त्यांनी ‘कश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यास नकार दिला होता.

केजरीवाल अर्बन नक्षली – भाजप

केजरीवाल हे अर्बन नक्षलवादी आहेत. ‘कश्मीर फाईल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागितली पाहिजे. केजरीवाल यांच्याविरुद्धचे आंदोलन सुरूच राहील, असे भाजप युवा मोर्चाचे तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे.

पोलिसांनीच हल्लेखोरांना घरापर्यंत पोहचविले

भाजपचे कार्यकर्ते गुंड आहेत. या गुंडांना पोलिसांनी साथ दिली. पोलिसांनी हल्लेखोरांना रोखले नाही. उलट त्यांना केजरीवाल यांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी मदत केली. ‘भाजपला अरविंद केजरीवाल यांना जीवे मारायचे आहे. त्यांच्या हत्येचा कट रचला गेला आहे. त्यासाठीच हल्ला केला गेला’. हल्ला झाला तेव्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सुर्या हजर होते, असा गंभीर आरोप आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. पंजाब निवडणुकीत झालेला पराभव भाजप पचवू शकलेला नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले केले जात आहेत, असे ते म्हणाले.