तीन महिन्यांत 20 हेक्टर जमीन वणव्यात खाक, हिरवे शहापूर ‘काळे’ झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाचे वरदान लाभलेल्या शहापूर तालुक्यातील हिरवाई आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन महिन्यांत लागलेल्या वणव्यामध्ये 20 हेक्टर जमीन खाक झाली असून वन्यजीव तसेच औषधी वनस्पतींनाही धोका निर्माण झाला आहे.

गवत कापणीनंतर डोंगर पेटवून देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून मोहाची फुले, करवंदे, जांभळाची झाडे, कैरी, तोरणे गोळा करण्याच्या नावाखाली हा निसर्गाचा ठेवा लुप्त होत चालला आहे. दरम्यान हिरवे शहापूर ‘काळे’ झाल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून वणव्याचे प्रकार लवकरात लवकर थांबवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

शहापूर तालुक्यात वनविभागाची 57 हजार हेक्टरच्या आसपास जमीन असून गेल्या 3 महिन्यांत 20 हेक्टर जमिनीवर वणवा लागला आहे. शहापूर वनविभागाच्या अंतर्गत शहापूर, खर्डी, धसई, विहिगाव, वाशाळा व डोळखांब हे रेंज आहेत. गेल्या 3 महिन्यांत कसारा परिसरात सर्वात जास्त वणवे लागले. तर धसई भागात सर्वात कमी वणवे लागले आहेत. वणव्यात बिरवाडी येथील आंब्याची बाग, अघई येथील घर, खर्डीतील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जळून खाक झाली असून आतापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भातसा, अघई-तानसा अभयारण्य, अजनुप, दापूर, मुंबई-आग्रा महामार्गावरील डोंगर वणव्यामुळे बोडके झाले आहेत. बेलवड, जरंडी, तळवडा, पेंढरी, साखरोली व दहिगाव येथील परिसरातील वनराईदेखील जळून गेल्याने परिसर भकास झाला आहे.

गवत जाळल्यानंतर पुढील वर्षी चांगले गवत येते व राखेच्या भभराटीसाठी चांगला उपयोग होतो, अशी येथील आदिवासीची समजूत आहे. सध्या येथे जमीन विकण्याचा व्यवसाय तेजीत असल्याने दलालांमार्फत जमिनी दाखवण्यासाठी रात्रीच्या वेळी सर्रासपणे जंगलात आगी लावल्या जातात.

समाजकंटकांना पकडणार

वणव्यासंदर्भात जंगलाजवळ राहणाऱ्या गावात जनजागृती करण्याचे काम सुरू असून वनजमिनीवर वणवा पसरू नये यासाठी जाळ रेषा केल्या आहेत. वणवा लागल्याची माहिती मिळताच आमची टीम अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे वणवा विझवण्याचे काम करीत आहे. परंतु काही समाजकंटक आग लावून वणवा लागल्याचे दर्शवत असून त्यांना पकडण्यासाठी उपाय योजना सुरू आहे.
– अमोल जाधव (उपवनसंरक्षक)