महाराष्ट्रात मराठी शिकावीच लागेल हा अत्याचार नव्हे, आग्रह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्राला मराठी भाषा मिळाली. त्यामुळे या राज्यात मराठी भाषेत पाटय़ा असल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातील शाळेत मराठी भाषा शिकलीच पाहिजे. हा अत्याचार असू शकत नाही, आग्रह आहे. या राज्याच्या राजधानीत मराठी भाषेचा ठसा कोणी पुसण्याचा प्रयत्न केला तर योग्य ती अक्कल शिकवली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला विरोध करणाऱयांना ठणकावले.

चर्नी रोड येथे उभारण्यात येणाऱया मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यानिमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरताना कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात मराठी भाषिकांवर जो भाषेचा अत्याचार होत आहे तो कदापि सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

या सोहळय़ाला उपस्थित असलेल्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या मातृभाषेचे मंदिर उभे राहत आहे. अशा या मंदिराचे भूमिपूजन म्हणजे माझ्या आयुष्यातील मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले.

मराठी माणूस व संघर्ष

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठी माणूस यावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठी माणूस म्हटल्यावर आयुष्यात संघर्ष आलाच, पण ज्यावेळेला देशाची भाषावार, प्रांतवार रचना झाली तेव्हा प्रत्येकाला एक प्रांत व राजधानी मिळाली, मात्र मराठी माणसाला व महाराष्ट्राला आपली राजधानी मुंबई मिळाली नाही, तर लढून, रक्त सांडून, बलिदान करून मिळवावी लागली हा इतिहास आहे. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राचे दालन आपण शिवाजी पार्कला केले आहे. हे दालन अजून मोठे करायचे आहे. कारण जो इतिहास विसरतो त्याला भविष्य घडवता येत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील अग्रणी होते. मुंबईसाठी माझे आजोबा लढले. मुंबई मिळाल्यावर मराठी माणसाचा गळा जेव्हा आवळला जात होता तेव्हा मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेने केले याचा मला अभिमान आहे आणि मराठी भाषा भवनाच्या पाटीवर आजोबांचा नातू व शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री म्हणून माझे नाव लागले त्यापेक्षा कोणतेही मोठे समाधान नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मराठी भाषा भवनाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हे अत्यंत भव्य दिमाखदार भवन होत आहे. कारण आपण जे काही करतो ते जगातले सर्वोत्तम असले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. देशातील नव्हे तर परदेशातील माणसे मराठी भाषा भवन बघायला आली पाहिजेत. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी मराठी भाषेचे वैभव व भाषेची श्रीमंती पाहण्यासाठी येथे आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा भवनाच्या शेजारी मराठी रंगभूमीची वाटचाल दाखवणारे रंगभूमीचे दालन करीत आहोत, अशी माहिती त्यांनी यानिमित्ताने दिली.

मातृभाषेचा न्यूनगंड नको

मराठी व इतर भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला इतर भाषेचा द्वेष नाही, पण या राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषेसाठी कायदा करावा लागतो. मराठी भाषेमध्ये फलक असेलच पाहिजेत हा कायदा करावा लागतो. पण ही वेळ आपल्यावर कोणी आणली याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मराठी भाषेबद्दल बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला, असा माझा आग्रह आहे. आमच्यावर अनेकदा टीका होते. पूर्वीही झाली, आताही होते. पण टीकेला आम्ही किंमत देत नाही. टीका करणारे लोक काय किमतीचे आहेत ते मला माहीत आहे. आम्ही मराठी भाषेचा आग्रह धरतो आणि आमची मुले इंग्रजी शाळेत गेली अशीही टीका झाली होती. पण शिवसेनाप्रमुखांनी पहिल्या दिवसापासून सांगितले होते की, शाळेत इंग्रजी भाषा, पण घरात मराठी भाषाच बोलली पाहिजे, असा आग्रह होता. घरात मॉम-डॅड चालणार नाही. घरात आई-बाबा-आजोबा अशीच हाक मारली पाहिजे. माझी दोन्ही मुले उत्तम मराठी आणि हिंदीही बोलतात. जास्तीत जास्त भाषा शिकणे हा काही गुन्हा नाही. दुसऱया भाषेचा द्वेष जरी करायचा नसला तरी आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठी विरोधकांची पोटदुखी

मराठी भाषिक कोणावर अत्याचार करीत नाही. या राज्यात मराठी भाषा शिकलीच पाहिजे. हा अत्याचार असू शकत नाही. हा आग्रह आहे. दुकानांवरच्या पाटय़ा मराठीत असल्याच पाहिजेत, पण त्याबद्दल ज्या लोकांना पोटदुखी आहे त्या पोटदुखीचा इलाज करावा लागेल. मुंबईत येऊन आमच्या उरावर नाचावे एवढे आम्ही अत्याचार सहन करणार नाही. अत्याचारांचा मुकाबला करणारी ही मराठी भाषा आहे. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी तेजाने तळपत राहिली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

डॉक्टर आणि विद्यावाचस्पती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी भाषणात जोरदार टोलेबाजी केली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचीही थोडीशी गंमत केली. डॉ. कदम यांनी संशोधनात डॉक्टरेट घेतली आहे. त्याचा उल्लेख करताना डॉक्टर या इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द वापरावा लागला तर विद्यावाचस्पती असा वापरावा लागेल. मग विद्यावाचस्पती विश्वजित कदम असे बोलावे लागेल, असे सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

मराठी भाषिकांचे इंग्रजी संभाषण

दोन मराठी माणसे भेटली की ते इंग्रजीत संभाषण सुरू करतात. इंग्रजी संपल्यावर दोघेही, अडखळतात मग हिंदी भाषेवर येतात. हिंदी संपल्यावर मग मराठी भाषेवर येतात. त्यापेक्षा संभाषणाची सुरुवातच मराठी भाषेत करा, असा सल्ला यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी मराठी भाषा भवनाच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मराठी भाषा भवनाच्या शेजारी शिक्षण विभागाची इमारत आहे. या ठिकाणी उद्योग मंदिर व विद्यामंदिर अशा दोन भव्य वास्तू उभारण्याची सूचना केली. मराठी भाषा भवनाची इमारत उभारण्याची जबाबदारी एमआयडीसीने घेतली आहे. त्याच धर्तीवर उद्योग व विद्यामंदिर उभारण्याची जबाबदारी घेण्याची एमआयडीसीची तयारी असल्याचे सुभाष देसाई म्हणाले.

या कार्यक्रमाला मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राहुल शेवाळे, आमदार दिवाकर रावते, सुनील शिंदे, ऍड. आशीष शेलार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व अन्य उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अस्त्र

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठी भाषा शैलीचे कौतुक केले. त्यांची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवत आहोत. त्यांची मराठी भाषाच वेगळी आहे. ते हळूहळू बोलताना मध्येच गुदगुल्या करतात. शालजोडीतले हाणून समोरच्या व्यक्तीचे वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरे यांची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे अस्त्र आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही चांगले मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्राला आपले करून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी या दोघांच्याही मराठी भाषेवरील प्रभुत्वाचे कौतुक केले.

मराठी भाषेची ताकद

मराठी भाषेच्या ताकदीचे उदाहरण देताना ते म्हणाले की, पारतंत्र्यात इंग्रजांशी लढताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा ठणकावून विचारणारा लोकमान्य टिळकांचा अग्रलेख मराठी भाषेतच होता. इंग्रजांच्या डोक्यात मराठी भाषा गेली आणि त्याचा परिणाम लोकमान्यांना कारावास झाला ही मराठी भाषेची ताकद आहे. मराठी भाषेची ताकद ओळखू शकत नाही हे मराठी भाषेचे नाही तर आपले दुर्भाग्य आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सीमाबांधवांवर अत्याचार नकोत

आमची भाषा कोणावर आक्रमण करणार नाही, पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात मराठी भाषिकांवर जो भाषेचा अत्याचार होत आहे तो कदापि सहन करणार नाही. सीमावासीयांच्या मागे ठामपणे व सोबत उभे राहावे लागेल. कारण तीसुद्धा आमच्या मातृभाषेचीच लेकरे आहेत. कारण ते जर त्यांच्या मातृभाषेत बोलण्याचा हक्क दाखवत असतील आणि मराठी माणसाचा मराठी भाषेचा हक्क डावलून त्यांच्यावर भाषेचा अत्याचार होणार असेल तर तो या देशात चालू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबईत येऊन पैसे कमावणार आणि मराठीचा द्वेष करणार?

दुकानांवर मराठी भाषेत पाटय़ा लावण्याचा कायदा केला त्यावर काही मराठीविरोधी शहाण्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने अशा लोकांना चपराक लावली. महाराष्ट्रात राहायचे आणि मराठीला विरोध करायचा हा नैतिकद्रोह योग्य नाही. राज्यात येऊन प्रगती करता, पण मराठी माणसाला-मराठी भाषेला विरोध करता हे योग्य नाही. या मराठी मातीचे ऋण तुमच्यावर आहे हे विसरू नका. मुंबईत येणार, पैसे कमवणार, पण मराठीचा द्वेष करू नका, अशा शब्दांत मराठीला विरोध करणाऱयांची अजित पवार यांनी कानउघाडणी केली. मराठी पाटय़ा न लावणाऱयांना झटका बसला की, मग बघा आम्हाला कसे वागवतात अशी ओरड करतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठी भाषेमध्ये फलक असलेच पाहिजेत हा कायदा करावा लागतो. पण ही वेळ आपल्यावर कोणी आणली याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

जास्तीत जास्त भाषा शिकणे हा काही गुन्हा नाही. दुसऱया भाषेचा द्वेष जरी करायचा नसला तरी आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये!

मराठी भाषेची ताकत ओळखू शकत नाही हे मराठी भाषेचे नाही, तर आपले दुर्भाग्य आहे!

दुकानांवरच्या पाटय़ा मराठीत असल्याच पाहिजेत, पण त्याबद्दल ज्या लोकांना पोटदुखी आहे त्या पोटदुखीचा इलाज करावा लागेल. मुंबईत येऊन आमच्या उरावर नाचावे एवढे आम्ही अत्याचार सहन करणार नाही.