आदिवासी पाड्यातील पूल, मोऱ्या, रस्त्यांची कामे मार्गी लागणार, पालघर जिल्ह्याला मिळाला 86 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाने पालघर जिल्ह्यासाठी 86 कोटींचा भरघोस निधी दिला आहे. हा निधी आदिवासी क्षेत्रातील रस्ते, पूल दुरुस्ती आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्हा परिषदेस 651 कामांकरिता 86 कोटींचा हा निधी आदिवासी विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील दळणवळण व वाहतूक व्यवस्थेमध्ये सुलभता येणार आहे. पालघर, डहाणू, मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड तालुक्यातील रस्ते बांधणी, रस्ते नूतनीकरण, रस्ते, पूल, मोऱ्या सुधारण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. हा निधी प्राप्त होण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे, अध्यक्ष वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, बांधकाम सभापती शीतल धोडी, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मेहनत घेतली.

असा होणार फंड खर्च

शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 651 रस्त्यांच्या कामांपैकी 240 कामे ही ग्रामीण मार्गाची आहेत. 143 कामे ही इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग या दर्जाची आहेत. तसेच 41 कामे ही पर्यटनस्थळे व यात्रास्थळे यांना जोडणाऱ्या रस्त्यांची असून 227 कामे ही गाव, वाड्या व पाडे यांना मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या रस्त्यांची आहेत. या सर्व कामांवर 86 कोटींचा निधी खर्च होणार आहे.

पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्हावासीयांचे सक्षमीकरण करणे हे मुख्य उद्दिष्ट या सरकारचे आहे. सर्वांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असल्याने विकासाची गंगा जिल्ह्यात वाहणार आहे

– वैदेही वाढाण, अध्यक्षा, जिल्हा परिषद.