सावधान… ‘या’ रेल्वे स्थानकांत अपघात घडल्यास काही धडगत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर एखादा अपघात घडल्यास प्रवाशाला मदत मिळण्यास उशीर होऊ शकतो. कारण सायंकाळनंतर या स्थानकांवर स्टेशनमास्तर कार्यालयाला टाळे लागत असल्याने प्रवाशांची काही धडगत नाही, असे विदारक चित्र आहे. कारण मध्य रेल्वेच्या स्टेशनमास्तरांची तब्बल 13 टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर सायंकाळनंतर स्टेशनमास्तरच उपलब्ध नसल्याने या स्थानकांवर बुकिंग क्लार्कवरच अपघाताचा ‘मेमो’ देण्याची जबाबदारी असते. स्टेशनमास्तराचा अपघात मेमो मिळाल्याशिवाय लोहमार्ग पोलिसांना जखमी प्रवाशाला दवाखान्यात ऍडमिट करता येत नसल्याने प्रवाशाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे अशा वेळी रात्रपाळीला एकटाच असलेल्या बुकिंग क्लार्कला तिकीटघर बंद करून अपघातग्रस्ताचा जीव वाचविण्यासाठी धावपळ करावी लागते. अशा वेळी तिकीट विक्री बंद झाल्याने प्रवाशांच्या रोषालाही सामोरे जावे लागते.

 येथे सायंकाळनंतर स्टेशनमास्तर नाही

मध्य रेल्वेच्या मस्जिद, सँडहर्स्ट रोड, माटुंगा, शीव, मानखुर्द, रे रोड, शिवडी आदी रेल्वे स्थानकांत सायंकाळनंतर स्टेशनमास्तर उपलब्ध नसतो. त्यामुळे या स्थानकांत मोठा अपघात घडल्यास योग्य निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात.

बुकिंग क्लार्कवर जबाबदारी

काही रेल्वे स्थानकांत स्टेशनमास्तरांऐवजी ‘सीएनसी’ म्हणजे कमर्शियल डिपार्टमेंटचा कर्मचारी जबाबदार अधिकारी असतो. उदाहरणार्थ सीनियर बुकिंग क्लार्कला अपघात घडल्यास ‘मेमो’ द्यावयाचा असतो. अशा वेळी त्या संबंधित प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी घाई करायची की तिकीट बुकिंग कार्यालय चालवायचे अशी द्विधा मनस्थिती तयार होत असते. अशा वेळी तिकीट विक्री बंद केल्याने प्रवाशांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. चिंचपोकळी, करी रोड, कांजूर मार्ग, डॉकयार्ड रोड, कॉटनग्रीन, चुनाभट्टी, गुरू तेगबहादूर नगर आदी स्थानकांत रात्री 12नंतर एकच बुकिंग क्लार्क असतो. त्याच्यावर ही जबाबदारी पडते.

‘सायको टेस्ट’ द्यावी लागते…

रेल्वेची भरती करताना लोको ड्रायव्हर व पायलट, गार्ड आणि स्टेशनमास्तर या तीनच पदांसाठी मानसशास्त्र्ााrय चाचण्यांची परीक्षा द्यावी लागते. इतके स्टेशनमास्तरांचे पद महत्त्वाचे मानले जाते. स्थानकात एखादा अपघात घडल्यास स्टेशनमास्तर यांना तातडीने निर्णय घ्यायचे असतात. तणावाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे या पदांसाठी ‘सायको टेस्ट’ द्यावी लागते.

 मध्य रेल्वेच्या स्टेशनमास्तरांच्या पदांची सद्यस्थिती

  मंजूर पदे   कार्यरत पदे  रिक्त पदे

  977         847       130