
ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपमध्ये असताना माझा वारंवार छळ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
”देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझा फायदाच झाला आहे. मोलाची मदत झाली. विधीमंडळात देवेंद्र फडणवीस पाचव्या क्रमांकाच्या टेबलवर बसत होते. मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवले. त्यांना वारंवार बोलायला संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास सर्वांचा विरोध होता. पण मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. असे अनेक विषय आहेत. देवेंद्रजींना मदत करण्याची भूमिका मी सातत्याने घेतली, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
”देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांचे स्वागतच केले. अशातही देवेंद्रजींनी माझ्या मागे चौकश्या लावणं, बदनाम करायचा प्रयत्न करणं, अंडरवल्डशी माझे संबंध, दाऊदच्या बायकोबरोबर माझे संभाषण, भूखंड घोटाळा, माझ्या पीएने लाच घेतली असे खोटे आरोप केले. त्यानंतर माझे तिकीट कापले गेले. नंतर माझ्यावर ईडीची कारवाई झाली. मला वारंवार छळण्याचा प्रकार यांच्याच आशिर्वादाने झाला. मला कधी व्यक्तिगत दुश्मनी असेल असे वाटलं नव्हतं. परंतू आता एकनाथ खडसे म्हणजे व्यक्तीगत दुश्मन आहे, अशा रितीने माझा जो छळ केला जात होता त्याचा मी वारंवार निषेध केला”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी सांगितले.































































