हिंदुस्थानात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून, चौथ्या लाटेची शक्यता आहे. लसनिर्मितीमध्ये हिंदुस्थान आघाडीवर असून, अद्यापही नवनवीन लसनिर्मितीसाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. पुण्याच्या सिरम वंâपनीने कोविशिल्ड व भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने देशासह जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. आता डेल्टा, ओमायक्रॉन या कोरोना विषाणूंना सक्षमरीत्या तोंड देणारी प्रतिपिंड (अॅण्टीबॉडी) तयार करू शकणाऱ्या कोविड प्रतिबंधक हिंदुस्थानी लसींची उंदरांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे या लसीला थंड वातावरणात ठेवण्याची गरज नसून उष्ण वातावरणात टिकू शकते.
बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि जैवतंत्रज्ञान कंपनी मायनव्हॅक्स यांनी कोरोना विषाणूच्या काटेरी कवचाच्या ‘रिसेप्टर बांयंडिग डोमेन’ (आरबीडी) या प्रथिनांच्या काही भागाचा या लसींसाठी उपयोग केला आहे. या प्रथिनांमुळे विषाणूला शरीरातील पेशींमध्ये शिरकाव करता येतो. या लसींची चाचणी प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. या लसींची चाचणी करणाऱ्या पथकात ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संशोधकांचा समावेश आहे. त्यांनी या लसीविषयीचे असे निरीक्षण नोंदवले, की ही लस 37 अंश सेल्सियस तापमानात चार आठवडे म्हणजे सुमारे महिनाभर टिकते. 100 अंश तापमानतही ही लस सुमारे 90 मिनिटे प्रभावी राहते. ऑक्सफर्ड निर्मित अॅस्ट्राझेनेका, हिंदुस्थानातील कोविशिल्ड या लसींना दोन ते आठ अंश सेल्सियस तापमानात ठेवावे लागते. फायझरच्या लसीला उणे 70 अंश सेल्सियस तापमानाची गरज असते.
सक्षम प्रतिपिंड (अॅण्टीबॉडी) निर्मिती
विषाणूसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या जर्नलमध्ये उंदरांवर या लसींचा प्रयोग केल्यानंतर डेल्टा, ओमायक्रॉन आदी कोरोना विषाणूवर तिचा काय परिणाम होतो, याचा उंदरांच्या रक्तनमुन्यांद्वारे अभ्यास केला गेला. त्यानुसार विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्याइतपत रोगप्रतिबंधक क्षमता उंदरांत निर्माण झाली होती. या लसींमुळे उंदरांत निर्माण झालेली प्रतिपिंड डेल्टा आणि ओमायक्रॉन विषाणूंना निष्प्रभ करण्यात यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले.































































