KGF 2 – 19 वर्षांच्या उज्ज्वल कुलकर्णीने एडिट केलाय तीनशे कोटींचा केजीएफ -2

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘केजीएफ-2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 143 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासह तांत्रिक बाबींचे समीक्षकांकडून काwतुक होत आहे. विशेष म्हणजे, तब्बल 300 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या बिग बजेट चित्रपटाचे एडिटिंग कोणा मोठय़ा एडिटरने नाही, तर अवघ्या 19 वर्षीय उज्ज्वल कुलकर्णी या तरुणाने केले आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी दिलेल्या संधीचे सोने करत कलेला वयाचे बंधन नसते हेच त्याने सिद्ध केले आहे.

उज्ज्वल कुलकर्णी याला एडिटिंगची आवड आहे. आतापर्यंत गंमत म्हणून त्याने अनेक शॉर्टफिल्म्स एडिट केल्या आहेत. त्यानंतर त्याने काही लघुपटांचे एडिटिंग केले. त्याने अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे फॅनमेड एडिटिंग केले असून त्याच्या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान लाईक्स मिळाल्या आहेत. ही गोष्ट जेव्हा दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी उज्ज्वलला एक संधी द्यायची ठरवले. प्रशांत यांनी उज्ज्वलला ‘केजीएफ 2’चा एक ट्रेलर तयार करायला सांगितला. त्याने तयार केलेला ट्रेलर पाहून प्रशांत त्याच्या कामावर खूप खुश झाले आणि त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या एडिटिंगची जबाबदारी उज्ज्वलच्या खांद्यावर सोपवली. त्यानेदेखील प्रशांत यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.