कस्तुरीने केले अन्नपूर्णा एक शिखर सर, आता पुढचे लक्ष्य एव्हरेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरने जगातील सर्वात अवघड अष्टहजारी अन्नपूर्णा एक शिखर सर केले आहे. 20 वर्षे सात महिने वयाची कस्तुरी हे शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे. आता तिचे पुढचे लक्ष्य माऊंट एव्हरेस्ट मोहीम सर करण्याचे आहे. एव्हरेस्ट मोहिमेसाठी तिला आर्थिक पाठबळाची गरज असल्याची माहिती तिचे वडील दीपक सावेकर यांनी दिली.

कस्तुरी 24 मार्च रोजी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर रवाना झालेली आहे. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने जगातील चौदा अष्टहजारी शिखरांपैकी सर्वात अवघड व खडतर असणाऱया दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा एक (उंची 26 हजार 545 फूट) निवडले व ते यशस्वीरीत्या सर केले.

कस्तुरीचे अन्नपूर्णा समिट 19 एप्रिल रोजी होणार होते. तिने 16 एप्रिल रोजी चढाई सुरू केली होती. मात्र खराब हवामानामुळे तिला कॅम्पवर परतावे लागले. ती 24 एप्रिल रोजी बेस कॅम्पवरून (उंची 1350 फूट) पुन्हा निघाली. कॅम्प एक, कॅम्प दोन तिने पार केले. कॅम्प दोन ते कॅम्प तीन दरम्यान सतत होणारे रॉक फॉल व हिमपात यांचा सामना करत ती कॅम्प तीनला 26 एप्रिल रोजी पोचली. कस्तुरी 27 एप्रिलला दुपारी कॅम्प चारला पोचली. सायंकाळपर्यंत थांबून रात्री साठेआठला तिने अंतिम चढाईला प्रारंभ केला. संपूर्ण रात्र चालून 28 एप्रिलला दुपारी साडेबाराला तिने शिखरमाथा गाठला. तिथे तिरंगा फडकावून ती इतर गिर्यारोहकांसोबत बेस कॅम्पला परतली. आता कस्तुरी काठमांडूहून लुक्लाला जाईल. तेथून ती एव्हरेस्ट बेसकॅम्पला जाईल. साधारण 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून कस्तुरी एव्हरेस्ट समिट करेल. या मोहिमेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन दीपक सावेकर यांनी केले आहे.

n अन्नपूर्णा एक शिखर खडतर एवढय़ासाठीच की माऊंट एव्हरेस्टचा डेथ रेट 14 टक्के आहे, तर माऊंट अन्नपूर्णा शिखराचा डेथ रेट 34 टक्के आहे. माऊंट एव्हरेस्टवर आतापर्यंत हजारो गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली आहे. पण अन्नपूर्णावर फक्त 350 गिर्यारोहकच यशस्वी चढाई करू शकले. कारण ते उंच, अत्यंत दुर्गम आणि चढाईसाठी अत्यंत अवघड समजले जाते.