रिक्षाचालकाला प्रसादातून दिले गुंगीचे ओैषध, 54 हजारांची सोनसाखळी लांबविली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे ओैषध देऊन त्यांच्या गळ्यातील 54 हजारांची सोनसाखळी चोरल्याची 14 एप्रिलला पद्मावती परिसरात घडली आहे. चोरट्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदीरात दर्शनाचा बहाणा करून प्रसादातून रिक्षाचालकाला बेशुद्ध करून लुट केल्याचे उघडकीस आले आहे. उपचारानंतर संबंधित रिक्षाचालकाने सहकानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिक्षाचालक अशोक बाबुराव सोनवणे (वय – 65, रा. गणेश चेंबर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

अशोक हे रिक्षाचालक असून 14 एप्रिलला पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांनी त्यांना प्रवाशी असल्याचे भासवून करीत रिक्षा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे नेण्यास सांगितले. त्याठिकाणी दर्शन घेण्याचा बहाणा करून हातात प्रसाद आणला. त्यानंतर चोरटे पुन्हा रिक्षात बसून काही अंतरावर त्यांनी अशोक यांना प्रसादातून गुंगीचे ओैषध दिले. रिक्षा पद्मावती परिसरात नेण्यास सांगितली. औषधामुळे अशोक यांना गुंगी आल्यामुळे ते बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 54 हजारांची सोनसाखळी लांबविली. काही वेळानंतर अशोक शुद्धीवर आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेंडे तपास करत आहेत.

जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाला लुटले

शहरातील मध्यवर्ती जंगली महाराज रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी मोटारचालकाला धमकावून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड लुटून नेली. ही घटना 29 एप्रिलला घडली असून नील जैन (वय – 25, रा. घोरपडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारचालक जैन जंगली महाराज रस्त्यावरुन जात असताना दुचाकीस्वार वेडीवाकडी दुचाकी चालवित होता. त्यामुळे जैन यांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर दुचाकीस्वाराने काही अंतरावर मोटार अडवून जैन यांना धमकावले. मारहाण करुन मोटारीत ठेवलेली पाच हजारांची रोकड लुटून नेली.