झाडे तोडण्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडे तोडण्याला विरोध केला म्हणून झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील ग्राम वन संरक्षण समितीचे प्रमुख असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. रायकेरा वन समितीचे अध्यक्ष शमीम अन्सारी (45) यांना जंगलातील झाडांच्या लाकडांचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या आरोपींनी पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

शुक्रवारी सकाळी अन्सारी आणि त्यांच्यासोबत एक वनरक्षक रायकेरा जंगलात गेले होते. यावेळी सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांना काही लोक झाडे तोडताना दिसून आली. अन्सारी यांनी या लोकांना झाडे तोडण्यापासून रोखले. याचा राग आल्याने झाडे तोडणाऱ्या व्यक्तींनी अन्सारी यांच्यावर हल्ला चढवला यावेळी अन्सारी यांच्या सोबत असणाऱ्या गार्डने घाबरून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र अन्सारी यांना आरोपींनी काठीने बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात देखील मारहाण केली व यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. तर इतर लोकांची ओळख आणि शोध मोहीम अजूनही सुरू आहे.